उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय ः पुरातन काळातील संस्कृती शिकवणार लखनौ | वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला ...
उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय ः पुरातन काळातील संस्कृती शिकवणार
लखनौ | वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्ड आणि सीबीएससी बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी आदित्यनाथ सरकारने बदलला आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास पुस्तकातून मुघल दरबार विषय कमी करण्यात आला आहे. तसेच ११ वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटवले आहेत. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे.
इतिहासाच्या पुस्तकासोबतच इतर विषयांमध्येही बदल करण्यात आला आहे. याआधी बारावी इतिहासाच्या पुस्तकात भारतीय इतिहासमध्ये शासक ते मुघल दरबार हे धडे होते. ही सगळी प्रकरणे आता वगळली आहेत. दुसरीकडे नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचं वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे हटवले आहेत. या निर्णयानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक म्हणाले, आपली संस्कृती हाच आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता ते शिकवले पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते, हा विषय शिकवलाच गेला नाही. त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत.
उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर समाजवादी पार्टीचे आमदार आणि माजी माध्यमिक शिक्षण मंत्री नवाब इकबाल मेहमूद म्हणाले, भाजपाचे सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात जे काही करता येईल ते सगळ करत आहे. मात्र नुसत इतिहासातून अभ्यासक्रम वगळून काय होणार? मुघल काळात भारताने खूप प्रगती केली होती हे कसे विसरता येईल? आता या सरकारने जी अभ्यासक्रमात सध्याची पुस्तके आहे, ती सगळी जप्त केली पाहिजेत. असे केले तर मुघल शासकांचा इतिहास होता याचा पुरावा नष्ट होईल. भाजपाकडून फक्त मतांच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जात आहे. ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार यांचा इतिहास फक्त भारतासाठीच मर्यादित नाही तर तो सगळ्या जगाला माहित आहे.
याआधी योगी सरकारने आग्रा मुघल म्युझियमचे नाव बदलले होते. योगी आदित्यनाथ सरकारने हे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असे ठेवले होते. गुलामीची मानसिकता दाखवणारी प्रतिके उत्तर प्रदेशात नकोत या आशयाचे ट्वीटही तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी केले होते.
COMMENTS