अकोला। नगर सहयाद्री - अकोल्यामधील पारसगावातील बाबूजी महाराज मंदिराच्या शेडवर झाड कोसळून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या...
अकोला। नगर सहयाद्री -
अकोल्यामधील पारसगावातील बाबूजी महाराज मंदिराच्या शेडवर झाड कोसळून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये ४० जण जखमी झाले आहेत. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या दुर्घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
अकोलातल्या बाळापुर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच शेडवर अचानक कडूलिंबाचं झाड कोसळले. झाड शेड वर कोसळल्यामुळे शेडखाली ५०ते ६० गावकरी दबले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केला आणि जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. तर ४० जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पारसची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळले आणि ते शेड कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावे अशा सूचना दिल्या आहेत.
'या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारच्या वतीने केला जाईल. तर मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येईल. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या सर्व संवेदना या परिवाराच्या सोबत आहे.' 'अवकाळी पावासाच्या संदर्भातील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS