मुंबई। नगर सहयाद्री - बऱ्याच गावात 100 कलाकार असलेल्या तमाशाला आयोजक दोन लाख रुपये द्यायला नकार देतात, तर दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्र...
मुंबई। नगर सहयाद्री -
बऱ्याच गावात 100 कलाकार असलेल्या तमाशाला आयोजक दोन लाख रुपये द्यायला नकार देतात, तर दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पाच-पाच लाख रुपये देतात. यावरुनच लोककलेची 'गौतमी पाटील' करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, असं वक्तव्य ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलं आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेत आहे. अनेक तरुणांच्या गळ्यातील ती ताईत आहे. गौतमी पाटील कार्यक्रम आणि तिचं नृत्य यावरुन टीकेचा सामनाही करावा लागला होता. गौतमीच्या मानधनावरून इंदोरीकर महाराजांनीही काही दिवसांपूर्वी टिप्पणी केली होती. अशातच आता ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे.
ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर बोलताना म्हणाले की, "बऱ्याच गावचे लोक 100 कलाकार असलेल्या तमाशाला दोन लाख रुपये द्यायला तयार होत नाही आणि दुसरीकडे चार मुली अन् पाचवी गौतमी पाटील असलेल्या कार्यक्रमाला पाच-पाच लाख रुपये देतात, हे काय चाललंय...? लोककलेची गौतमी पाटील करू नका, अन्यथा महाराष्ट्र हा बिहार होईल."
"गौतमी पाटील ज्या पद्धतीनं अश्लील हातवारे करते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात, मारामाऱ्या करतात कुठं घेऊन चाललोय आपण महाराष्ट्राला हे पाहायला हवं... पालकांनीही आपला पाल्य कुणाच्या कार्यक्रमाला चालला आहे, याकडे लक्ष दिलं पाहिजे, पुढाऱ्यांचे तर याकडे दुर्लक्षंच आहे.", असं म्हणत जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर म्हणाले आहे.
COMMENTS