अहमदनगर | नगर सह्याद्री - हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून त्याद्वारे खात्यातील ५५ हजार रूपये काढून घेत एका वृद्धाची फसवणूक करण्यात आली. महारूद...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून त्याद्वारे खात्यातील ५५ हजार रूपये काढून घेत एका वृद्धाची फसवणूक करण्यात आली. महारूद्र सूर्यभान सोन्ने (वय ५८ रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. २१) सकाळी नगर-मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल शेजारी असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये घडली. या प्रकरणी सोन्ने यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम कार्ड घेऊन शुक्रवारी सकाळी नगर-मनमाड रोडवरील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेथे एक अनोळखी व्यक्ती होता. तो फिर्यादीला म्हणाला, लवकर आवरा, तुम्हाला मी पैसे काढून देतो, तुम्ही चुकीचे बटन दाबत आहात, म्हणून वेळ होत आहे. त्या व्यक्तीने फिर्यादीचे एटीएम कार्ड मशीनमधून बाहेर काढले व फिर्यादीच्या हातात दिले. पैसे न निघाल्याने फिर्यादी माळीवाडा येथील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये गेले. तेथे त्यांना कार्ड ब्लॉक असल्याचे समजले. त्यानंतर लगेच त्यांच्या खात्यातून १५ हजार रूपये आशीश लक्ष्मण कोल्हे या व्यक्तीच्या खात्यात पाठविल्याचे व १० हजाराचे चार विड्राल केल्याचे मेसेज आले. आपल्या कार्डची अदलाबदल करून ५५ हजार रूपये खात्यातून काढून घेत फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने पोलीसांकडे धाव घेतली.
COMMENTS