वादळी वारा, पावसामुळे अर्धा तास मतदान बंद | प्रशासनासह उमेदवार, मतदारांची धांदल पारनेर | नगर सह्याद्री कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्य...
वादळी वारा, पावसामुळे अर्धा तास मतदान बंद | प्रशासनासह उमेदवार, मतदारांची धांदल
पारनेर | नगर सह्याद्री
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या १८ जागेसाठी शुक्रवारी पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मतदान प्रक्रिया सुरू झाली. सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी मतदारसंघातील मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली. या बाजार समिती निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात 1341 पैकी 1320, ग्रामपंचायत मतदार संघ 1052 पैकी 1039, व्यापारी मतदारसंघ 576 पैकी 564, हमाल मापाडी 162 पैकी 154 मतदान झाले. 3130 पैकी 3070 मतदान झाले असून 98 टक्के मतदान झाले.
एकच मतदान केंद्र असल्याने ससेहोलपट
बाजार समिती निवडणुकीसाठी पारनेर येथे एकच मतदान केंद्र असल्याने सेवा संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल मापाडी सर्वच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. गेल्या निवडणुकीत दोन केंद्र होते. यावेळी एकच केंद्र असल्याने मतदारांना आपले मतदार यादीतील नाव शोधण्यापासून मतदान करण्यापर्यंत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.
निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट यांची महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेल व भाजपच्या जनसेवा पॅनेलमध्ये लढत आहे. शनिवारी सकाळी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मतमोजणी होणार आहे. पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १८ जागेसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. पारनेर तालुयात बाजार समितीच्या निवडणूक निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाची महाविकास आघाडी भारतीय जनता पक्षाविरोधात उतरली आहे.
अर्धा तास वादळी वार्यासह पावसाची हजेरी
बाजार समिती मतदानावेळी शुक्रवारी सकाळी १० वाजता पारनेरसह परिसरात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास यामुळे मतदान ठप्प झाले. अचानक आलेल्या पावसामुळे केंद्रावर अधिकारी, उमेदवार व नेत्यांची धावपळ उडाली. वादळी वार्यासह पावसामुळे रस्त्यांच्या कडेची मोठी झाडे उन्मळून पडली. सुपा येथील वीज उपकेंद्रातुन पारनेर व तालुयातील इतर गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. म्हसणे फाट्यासमोरील तारांवर वडाचे झाड कोसळल्याने मध्यरात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता.
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगला. बाजार समिती निवडणुकीसाठी प्रामुख्याने सेवा संस्थेच्या ११ जागेसाठी २३, ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ जागेसाठी ९, व्यापारी मतदारसंघातील २ जागेसाठी ४, हमाल मापाडी मतदारसंघातील १ जागेसाठी ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप खासदार सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. सर्वपक्षीय प्रमुख नेते मतदार केंद्राबाहेर ठाण मांडून होते.
COMMENTS