लोकशाही वाचविण्यासाठी जनजागृती करणार अहमदनगर | नगर सह्याद्री उद्योजक अदानी यांना २० हजार कोटी रुपये कोठून व कसे मिळाले? अदानी व पंतप्रधान न...
लोकशाही वाचविण्यासाठी जनजागृती करणार
अहमदनगर | नगर सह्याद्री
उद्योजक अदानी यांना २० हजार कोटी रुपये कोठून व कसे मिळाले? अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय?, असे फक्त दोनच प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारले असताना भाजप त्याची उत्तरे का देत नाही?, असा सवाल माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी येथे केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ख़ासदारकी रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या निषेधासह देशात भविष्यात लोकशाही राहील की नाही, याबाबत जनजागृतीसाठी गावपातळीपासून देशपातळीपर्यंत काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे आ. थोरात म्हणाले.
राहुल गांधी यांनी परदेशात भारताची बदनामी केल्याचा दावा करून भाजपने त्यांच्याविरुद्ध आंदोलने केली आहेत. दुसरीकडे राहुल गांधींना संसदेत बोलू दिले जात नाही व त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना घरही खाली करण्यास सांगितले. याच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेसने एप्रिल महिनाभर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत आ. थोरात यांनी भाजपवर टीका केली.
आ. थोरात म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने वागते म्हणण्यापेक्षा लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्यांचा आवाज आतापर्यंत दाबला गेला, आता विरोधातील नेत्यांचेही आवाज दाबले जात आहेत. हे निरोगी लोकशाहीचे लक्षण नाही. देशातील लोकशाही संपण्याच्या दिशेने जात असल्याने याचा अर्थ देशात हुकूमशाही नाही तर काय आहे? देशातील घडामोडींमुळे जनतेला काळजी आहे.
देशातील लोकशाही कशी पुढे जाणार, असा त्यांचा प्रश्न आहे. राहुलजींनी कन्याकुमारी ते काश्मीर साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढून वाढती महागाई व बेरोजगारीसह सत्ताधारी भाजपच्या तत्वज्ञानाविरोधात जागृती केली आहे. त्यांची ही भूमिका तसेच वाढती महागाई व बेरोजगारी, अवकाळी नुकसानीची मदत, कांदा अनुदानातील जाचक अटी व अन्य मुद्दे गावागावांतून काँग्रेसद्वारे मांडले जाणार असल्याचेही आ. थोरात म्हणाले.
यावेळी श्रीरामपूरचे आ. लहू कानडे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, शहर ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, सरचिटणीस दशरथ शिंदे, प्रताप पाटील शेळके, अनिस चुडीवाला, संजय झिंजे, प्रवीण गीते, मनसुख संचेती, निजाम जहागीरदार, गणेश चव्हाण, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, अलतमश जरीवाला, शैलाताई लांडे, अखिल भारतीय स्तरावरील पक्ष समन्वयक मंगल भुजबळ आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS