अहमदनगर | नगर सह्याद्री सात लाख रूपये लूट प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. लोकांकडून उसनवारीने घेतलेले पैसे बुडविण्यासाठी फिर...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सात लाख रूपये लूट प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. लोकांकडून उसनवारीने घेतलेले पैसे बुडविण्यासाठी फिर्यादीनेच बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. संदीप गणपतराव फुगे (वय ३८, रा. पाचेगांव, ता. नेवासा) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्या घरातून सात लाखाची रक्कम हस्तगत केली आहे.
याबाबत माहिती अशी, की संदीप फुगे याने बँकेतून होमलोन मंजूर झालेली ७ लाखांची रक्कम लुटण्यात आल्याची फिर्याद दिली होती. रक्कम असलेली कापडी पिशवी मोटार सायकलच्या हँडेलला अडकून टाकळीभान ते पाचेगाव रस्त्याने घरी जात असताना काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोघांनी चाकुचा धाक दाखवून रक्कम लुटल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पथक नियुक्त केले. सपोनि गणेश वारुळे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, रवींद्र सोनटक्के, भीमराज खर्से, योगेश सातपुते, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांचा पथकात समावेश होता. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी फुगेकडून माहिती घेतली.
तो विसंगत माहिती सांगत असल्याचे निदर्शनास आले. गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. तसेच फिर्यादी फुगे यास विश्वासात घेऊन विचारले असता, त्याने लोकांकडून उसनवार घेतलेले पैसे बुडविण्यासाठी बँकेतून काढलेली ७ लाखांची रक्कम घरी ठेवली. त्यानंतर रस्तालूट झाल्याचा बनाव करुन नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्या घरातून रक्कम हस्तगत करुन त्यास ताब्यात घेतले.
COMMENTS