पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची माहिती ः ठाण मांडलेल्यांना धक्का बसणार अहमदनगर | नगर सह्याद्री - जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या बद...
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची माहिती ः ठाण मांडलेल्यांना धक्का बसणार
अहमदनगर | नगर सह्याद्री -
जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यासाठी पुढील आठवड्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सर्वांना एकत्र बोलून समोरासमोर विचारणा करून बदल्या केल्या जाणार आहेत. एका पोलीस ठाण्यात पाच व त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या पोलीस अंमलदारांच्या सुरूवातीला बदल्या करण्यात येणार असून त्यानंतर विनंती बदल्यांचा विचार केला जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्यानंतर दोन वर्ष कोविडमुळे अपवाद वगळता अंमलदारांच्या बदल्या झाल्या नाहीत. अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या अंमलदारांचे प्रमाण मोठे आहे. अधीक्षक ओला यांनी आदेश काढून बदल्यांबाबत माहिती मागितली होती. सुमारे ६०० पेक्षा जास्त पोलीस अंमलदारांना पाच व त्यापेक्षा जास्त कालावधी एका पोलीस ठाण्यात झाला आहे. त्यांनी अर्ज सादर केले आहेत. याशिवाय काही पोलीस अंमलदारांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केले आहेत.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्यातील बदलीपात्र पोलीस अंमलदारांना बोलविण्यात येणार आहे. अर्जामध्ये दिलेल्या ठिकाणांचा विचार करून व समोरासमोर विचारणा करून सुरूवातीला सहायक फौजदार व त्यानंतर हवालदार, नाईक, शिपाई यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. प्रशासकीय बदल्या पूर्ण झाल्यानंतर विनंती बदल्यांचा विचार केला जाणार आहे. निवृत्तीला आलेल्या पोलीस अंमलदारांना त्यांच्या सोयीनुसार बदली देण्यात येणार आहे. पारदर्शक पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.
‘नो’ स्थगिती
एकाच पोलीस ठाण्यात व स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) वर्षांनुवर्षे ठाण मांडलेल्या अनेक अमंलदारांनी आणखी एक वर्ष त्याच ठिकाणी राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अशांना आता तेथे ठेवले जाणार नसल्याचे अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाच व त्यापेक्षा अधिक वर्ष एकाच ठिकाणी असलेल्या पोलीस अंमलदारांच्या बदल्यांना कोणतीही स्थगिती मिळण्याची शक्यता नाही.
मूळ तालुयात बदली नाही
जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात त्याच तालुयातील पोलीस अंमलदार कार्यरत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कामांमध्ये त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. अशा पोलीस अंमलदारांना बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहे. पोलीस अंमलदार ज्या तालुयाचे रहिवाशी आहेत, अशांना त्याच तालुयातील पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली जाणार नाही, असेही अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS