अहमदनगर | नगर सह्याद्री श्रीराम नवमीनिमित्त शहरातून गुरूवारी (दि. ३०) सायंकाळी काढलेल्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही कर...
अहमदनगर | नगर सह्याद्री
श्रीराम नवमीनिमित्त शहरातून गुरूवारी (दि. ३०) सायंकाळी काढलेल्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही कर्णकर्कश डीजेचा आवाज घुमला. या प्रकरणी संबंधित मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालक अशा चार जणांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदु राष्ट्र सेना मंडळाचे अध्यक्ष संजय पांडुरंग आडोळे, डीजे मालक विजय मोहन जगताप (रा. कॅम्प, पुणे), सकल हिंदू समाज मंडळाचे अध्यक्ष दिगंबर लक्ष्मण गेंट्याल, डीजे मालक राहुल मोहन गायकवाड (रा. गव्हाणी पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पोकॉ उमेश शेरकर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दि. ३० रोजी दुपारी साडेचार ते रात्री दहाच्या दरम्यान श्रीराम नवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुकीतील मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व डीजे मालक यांनी डीजे लावून कर्णकर्कश आवाजात गाणे वाजवून ध्वनी प्रदूषण केले. त्यांना बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार यांनी वेळोवेळी आवाज कमी करण्यासाठी सूचना केली.
परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून आवेशपूर्ण घोषणाबाजी करून जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाचे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी क्षेपकाबाबतच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS