अहमदनगर / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यात शिवसेनेचे काम जोरकसपणे सुरू आहे....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यात शिवसेनेचे काम जोरकसपणे सुरू आहे. संघटनेत काम करताना चर्चा होत असतात आणि त्यातून कधी- कधी वैचारिक मतभेद होत असतात. मात्र, मनभेद कधीच नसतात. तसाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील विकास कामांबाबत चर्चा करताना झाला. वाद झाले याचा अर्थ हाणामारी झाला असा नाही. आमच्या दोघांमध्ये अत्यंत चांगले संबंध असून कोणताही वाद नसून जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार केवळ गैरसमजातून झाली असून ती तक्रार मी मागे घेत असल्याचे पत्रक शिवसेनेचे पारनेर तालुका प्रमुख विकास रोहोकले यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
रोहोकले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आमच्या दोघांमध्ये वाद झाल्याचे आणि आमच्यात मतभेद झाल्याचे वृत्त आमच्या दोघांच्याही वाचण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नाही. मार्केटयार्ड परिसरातील कार्यालयामध्ये शिवसेनेचे कार्यालय आहे. या कार्यालयात शिवसैनिक आणि पदाधिकारी नेहमीच येत असतात. प्रलंबीत कामे आणि प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम आमचे पदाधिकारी येथे करत असतात.
मार्केटयार्ड कार्यालयात विविध विकास कामांबाबत शुक्रवारी मी व जिल्हा प्रमुख अनिल शिंदे अशी आम्हा दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत विकास कामे आणि अन्य विषयांवर चर्चा चालू असताना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्याबाबत माझा गैरसमज झाला. ते मला समजावून सांगत असताना मला त्यांच्याबाबत राग आला आणि ते मला दमदाटी करत असल्याचे जाणवले. त्याच गैरसमजातून मी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. वास्तविक त्यात कथन केल्याप्रमाणे काहीही घडलेले नाही. जे झाले ते गैरसमजातून झाले असल्याचे पारनेर तालुका प्रमुख विकास रोहोकले यांनी निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना वाढतेय याचाच विरोधकांना पोटशूळ- अनिल शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागत आहेत. जनतेचा आणि शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना जिल्ह्यात पक्ष संघटनेत इनकमींग मोठ्या प्रमाणात चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळत असलेला शिवसैनिकांसह सामान्य जनतेचा प्रतिसाद याचा विरोधकांना पोटशूळ उठला आहे. विकास रोहोकले आणि माझ्यात तसेच शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकार्यात कोणताच वाद नाही. आम्हाला बदनाम करण्याचे विरोधकांचा षडयंत्र असून ते शिवसैनिक हानून पाडतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे.
COMMENTS