अहमदनगर | नगर सह्याद्री व्यापार्यास स्वतःच्या नावावर ५५ लाखांचे कर्ज घेऊन दिले. त्यास बँकेचे हप्ते भरण्यास सांगितले असता, त्याने चौघांच्य...
अहमदनगर | नगर सह्याद्री
व्यापार्यास स्वतःच्या नावावर ५५ लाखांचे कर्ज घेऊन दिले. त्यास बँकेचे हप्ते भरण्यास सांगितले असता, त्याने चौघांच्या मदतीने कांदा व्यापार्यास बेदम मारहाण केली. शहरातील बाजार समिती जवळील पुनममोतीनगरमध्ये गुरूवारी (दि. १३) दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ही घटना घडली.
नितीन दत्तात्रय चिपाडे (वय ४० रा. सारसनगर) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी बाजार समिती जवळील पुनममोतीनगर येथील व्यापारी अशोक देसरडा यांना स्वतः व पत्नीच्या नावावर भारतीय स्टेट बँक, एमआयडीसी शाखेतून ५५ लाख रूपयांचे कर्ज २०१८-१९ मध्ये घेऊन दिले होते. या कर्जाचे हप्ते त्यांनी भरायचे ठरले होते. मात्र, बँकेत व्याजाचे हप्ते वेळेत न भरल्याने बँकेकडून एसएमएस तसेच संपर्क साधून कर्ज भरण्यास वारंवार सांगितले जाऊ लागले. त्यामुळे नितीन चिपाडे गुरूवारी अशोक देसरडा यांच्या पलक एजन्सी पुनममोतीनगर येथे गेले होते. त्यावेळेस तेथे असलेले महेंद्र उपाध्ये आणि मजरलाल तांबोळी यांच्यासह आणखी दोन जणांनी येथे कशासाठी आला, असे विचारले. त्यावेळेस कर्जाची रक्कम भरून घेण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यानंतर महिंद्र उपाध्ये आणि तांबोळी यांच्यासह अनोळखी दोन अशा चौघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे बेशुद्ध पडल्यावर चुलते सोमनाथ आणि लहान भाऊ तेजस यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या ठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS