व्यापारी मित्रांनो, बंदची हाक पुरे; आधी ‘जयकांत’ वृत्तीतील भिकार गिधाडांना थोपवा एसपी साहेब, खाकीचा धाक संपलाय का? नगर शहरात दिवसाढवळ्या कश...
व्यापारी मित्रांनो, बंदची हाक पुरे; आधी ‘जयकांत’ वृत्तीतील भिकार गिधाडांना थोपवा
एसपी साहेब, खाकीचा धाक संपलाय का?
नगर शहरात दिवसाढवळ्या कशा चालतात तलवारी? | छातीवर वार झेलणार्या नवलानींच्या धाडसाचे कौतुकच
सारिपाट / शिवाजी शिर्के
एसपी साहेब, नगरमध्ये कायद्याचं राज्यच राहिलेले नाही. खाकी वर्दीचा धाक संपला तर नाही ना, असाच काहीसा प्रश्न नगरकरांना पडलाय! नगरमधील व्यापार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे आणि त्यातूनच त्यांनी बंदची हाक दिलीय! नगरच्या बाजारपेठेत हातगाडीवाल्यांची आणि त्यांना पाठबळ देणार्यांची मोठी दहशत आहे. दुकानदारांच्या समोर हातगाडी लावायची आणि त्याने विरोध केला तर त्यालाच मारहाण करायची! हातात तलवारी, चाकू घेऊन थेट हल्ला करणार्यांचा बंदोबस्त पोलिसांना करावा लागणार आहे. हल्लेखोरांना अटक झालीय, अशी टिमकी वाजवून चालणार नाही. हल्लेखोरांना पाठबळ देणार्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असलेल्या राकेश ओला यांच्याकडून नगरकरांच्या मोठ्या अपेक्षा! पण, त्या अपेक्षांवर पाणीच फिरल्यासारखे झाले आहे. कायदा, खाकी वर्दी याला फाट्यावर मारणार्या अवलादी दिवसाढवळ्या हातात तलवारी, चाकू घेऊन नंगानाच करत आहेत. व्यापार्यांवर होणारे हल्ले थांबायला तयार नाहीत. एसपीसाहेब, कायम अस्वस्थ समजली जाणारी व्यापारी मंडळी आता थेट बंडाच्या पावित्र्यात दिसू लागली आहेत. हे बंड पोलिसांना त्रासदायक ठरणार असले तरी त्याची सर्वात मोठी किंमत राजकारण्यांना मोजावी लागणार आहे.
दुकानासमोर हातगाडी लावण्यास विरोध केला म्हणून नवलानी, बोगावत यांच्यावर थेट चाकू हल्ला झालाय. नवलानी गंभीर जखमी झालेत. आठ-दहा दिवसांपूर्वी बार्शीकर यांच्यावर असाच चाकू हल्ला झाला. चाकू, तलवारी घेऊन दुकानदारांना मारहाण करण्याच्या घटना सातत्याने घडत असताना पोलिस नक्की काय करत आहेत, असा प्रश्न आहे. आरोपींना अटक झाली असली तरी कायद्याचा धाक राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तलवारी, चाकू हातात घेऊन दहशत पसरविण्याचे आणि व्यापार्यांना धमकावण्याचे प्रकार थांबायला तयार नाहीत. राजकीय वरदहस्तातून हे सारे होत असल्याची चर्चाही थांबायला तयार नाही.
नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील कापडबाजार, शहाजी रोड, गंज बाजारातील हातगाडीवाले आणि त्यांची दहशत दुकानदार आणि व्यापार्यांना मोठी डोकेदुखी झाली आहे. दुकानासमोर हातगाडी लावायची आणि दुकानदाराकडे ग्राहकांना जाण्यास रस्ता देखील ठेवायचा नाही, असा काहीसा प्रकार राजरोसपणे चालू आहे. कापडबाजारात हातगाडीवाल्यांना संरक्षण देणारी एक टोळीच आहे. हातगाडीवाल्यांना हटवायला पालिका अथवा पोलिस गेले तर ही टोळी लागलीच पुढे येते. या टोळीला हातगाडीवाले हप्ते देत असल्याची चर्चा आहे. दुकानदारांना वेठीस धरुन आणि प्रसंगी धमकावून, मारहाण करून दहशत निर्माण करणारे आता हातात चाकू, तलवारी घेऊन नंगानाच करु लागले आहेत.
शहाजी रोडवरील नवलानी यांच्या दुकानासमोर हातगाडी लावण्याच्या मुद्यावर जे काही झाले ते नवलानी यांच्या जीवावरच बेतले. या घटनेच्या निमित्ताने व्यापारी एकत्र आलेत आणि त्यांनी नगरमधील या हातगाडी वाल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. खरंतर व्यापारी-दुकानदारांना हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. बार्शीकर यांच्यानंतर नवलानी, बोगावत यांना तलवारीचे वार अंगावर घ्यावे लागले. त्यांनी विरोध केला नसता तर आज व्यापार्यांनी एकत्र येत बंदची हाक दिलीच नसती. अन्यायाच्या विरोधात ठामपणे सारे एकत्र आले, हेही नसे थोडके.
गेल्या काही महिन्यात नगर शहरात धार्मिक तेढ निर्माण होऊ पाहत आहे. हल्ले आणि त्यामागील कारणे वेगवेगळी दिसत असली तरी दोन समाजात तेढ निर्माण होऊ पाहत आहे. कालची घटना घडल्यानंतर आ. संग्राम जगताप यांनी सिव्हील हॉस्पिटल गाठले आणि त्यानंतर त्यांनी साईदीप हॉस्पिटलमध्ये ठिय्या देत सर्व व्यापार्यांना आधार देण्याचे काम केले. आता आमदार संग्राम जगताप यांनाच नगरमधील ही चिल्लर झुंडशाही मोडून काढण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. जातीय तेढ निर्माण करणार्या अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त पोलिसांच्या जोडीने समाजाचं पुढारपण करणार्या सार्यांनाच करावा लागणार आहे. नगरमध्ये टपोरीछाप गुंडागर्दी संपुष्टात आणण्याचे काम कृष्णप्रकाश यांच्या माध्यमातून झाले. खमकी भूमिका घेऊन राकेश ओला यांना नगरच्या रस्त्यांवर उतरावे लागणार आहे.
व्यापार्यांना वेठीस धरून दहशत, गुंडागर्दी होत असेल आणि अशा अपप्रवृत्तीच्या विरोधात पोलिस हात बांधून बसले तर त्यातून जे काही घडेल त्याला पोलिसच जबाबदार असतील. अन्यायाच्या विरोधात बंड करण्याचं बळ नगरच्या व्यापार्यांमध्ये आताशी कुठे दिसू लागले आहे. सार्याच राजकीय पक्षांनी या बंडाची धास्ती घेतलेली दिसतेय. अर्थात, राजकारणी मंडळी त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी काहीही आणि कोणतीही ‘सोंग’ घेतील. भूमिका ठरवायची आहे ती व्यापार्यांनी. नवलानी यांनी अंगावर वार घेतलेत. हे वार व्यर्थ जाऊ द्यायचे नसतील सार्याच व्यापार्यांनी ‘मै हूं नवलानी’ या नावाच्या टोप्या डोक्यात घालाव्यात आणि दुकानासमोर हातगाडी लावणार्यांना अटकाव करावा. ‘नवलानी यांच्या धाडसाचे कौतुकच केले पाहिजे’, असं काही व्यापारी कालच्याला साईदीप हॉस्पिटलमध्ये बोलताना पाहिली. खरं तर आता सार्याच दुकानदार, व्यापार्यांनी ‘मै हूं नवलानी’ ही भूमिका घेऊन संघटितपणे या असल्या दहशत पसरविणार्या अपप्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
व्यापारी बांधवांनो, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच आपण साजरा केला. पण, या पंचाहत्तर वर्षानंतरही तुमच्या दारात तलवारी, चाकू घेऊन दशहत पसरविणार्या अवलादी येत आहेत. ‘शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण शेजारच्या घरात’, ही भूमिका बदलण्याची गरज आहे. नवलानी यांच्या रुपाने आताशी कुठे एक शिवाजी महाराज जन्माला आल्याचे दिसते. आता प्रत्येकाने या अपप्रवृत्तीला विरोध करण्याची गरज आहे.
समाजहिताच्या आड येणारी, शांतता बिघडविणारी ही हुजर्यांची फौज! त्या भिक्कार फौजेला तुम्ही सॅल्युट ठोकता! पंच्चाहत्तरीतही ही अवस्था बदलली नाही. त्यासाठी कोणीतरी येईल आणि परिस्थिती बदलेल असेही नाही! त्यासाठी आपल्यातील मुर्दाडपणा जोपर्यंत जात नाही, अन्यायाच्या विरोधात बंड करण्याचं बळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या अवलादी संपणार नाहीत. नगर शहरात अनेक ठिकाणी ‘टपोरीछाप दादा’ निर्माण झालेत! समाजहिताचं कोणतंच काम हे टपोरी पोरं करत नाहीत. उलटपक्षी त्या भागातील शांतता बिघडविण्याच्या सुपार्या यांनी घेतलेल्या असतात! त्यातून दहशत निर्माण करायची आणि हप्तेखोरीची टपरी मांडायची! फुटाफुटावर दिसणार्या आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्या या लाळघोट्या गुंडांची जन्मकथा आपल्यापासूनच सुरू होते हे आपण विसरलोय! पंचाहत्तरीच्या निमित्ताने आपण नेमकं काय करतोय, स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून मी माझी कर्तव्य पार पाडतोय का? देशाच्या सीमेवर लढणार्या सैनिकांना सॅल्युट ठोकण्यापेक्षा आपण जर गोरगरीबांवर अन्याय करणार्या सो- कॉल्ड गुंडांना सॅल्युट ठोकत असाल तर आपण खरेच स्वतंत्र झालो आहोत का? पंचाहत्तरीतही या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असंच येत असेल तर त्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती?
व्यापारी मित्रांनो, आम्ही आमच्या ‘सारिपाट’च्या माध्यमातून संदीप खरे या प्रख्यात कवीची कविता मुद्दामहून मांडत आलोत. संदीप खरे म्हणतात, ‘मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवला नाही’. संदीप खरेंच्या या कवितेसारखं झालंय आपलं! अर्थात कालच्याला नवलानी त्यास अपवाद ठरले. त्यांनी त्यांचा प्रश्न ठामपणे मांडताना विरोध केला. अंगावर वार झाले असले तरी आता त्यांच्या दुकानासमोर हातगाडी लावण्याचे धाडस कोणी करणार नाही. व्यापारी मित्रांनो, आपण प्रत्येकजण जेव्हा ही लढाई व्यक्तिगत पातळीवर लढायला सुरुवात करू तेव्हा हळूहळू तिचा भव्य आविष्कार पहायला मिळेल. हा आपल्या सगळ्यांचाच प्रॅटिकल अनुभव आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकते! तुम्हाला प्रलोभने धुडकावता आली पाहिजेत! तुम्ही-आम्ही किती दिवस असे भेकडासारखे ढीम्म होऊन बसणार आहात? राजकारणी मंडळी वाजंत्र्यांची फौज बाळगून असतात. वाजंत्र्यांची फौज असलीच पाहिजे! जमानाच तसा आलाय! मात्र, अशी फौज पदरी बाळगणार्यांनीही आपण जनतेशी प्रातारणा तर करत नाही ना याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असं झालं तर आणि तरच या नवलानी यांच्या बंडाला काही अंशी यश मिळालं असं म्हणावं लागेल.
समाजातील अपप्रवृत्तीला संपविण्याचा मार्ग खूप सोपा असतो. ही अपप्रवृत्ती जन्माला येतेय असं दिसू लागताच तीला थोपविण्यासाठी निधडी छाती करून पुढे आलात तरी पुरे! त्यासाठी ढाण्या वाघ होण्याची अजिबात गरज नाही. ‘सिंघम’ नावाचा चित्रपट मध्यंतरी गाजला. त्यातील बाजीराव सिंघमचे पात्र सर्वांनाच भावले. मात्र याच चित्रपटातील जयकांत शिक्रेसारख्या प्रवृत्तीला संपवायचं असेल तर नुसतं ‘लई भारी’ असं म्हणून नाही चालणार! पुढे यावं लागेल तुम्हाला! जयकांत शिक्रेची पहिली स्टेप दिसताच तुम्ही त्याला आवर घातला तरी पुरे! आजही आपल्या गल्लित, चौकाचौकात असे हजारो जयकांत आहेत, टोळगिधाडांसारखं त्यांच जगणं. त्यांच्या टपोरी आणि भुक्कड जगण्याचं आपणच कौतूक करायचं. त्याच्या भिकार वागण्याला लईभारी म्हणायचं! दादा, बाबा, भाऊ असं तुम्ही त्याला म्हणत बसला की समजून घ्या की तुमच्या मोहल्ल्यात जयकांत नावाचं पाप तुम्ही वाढीस घालत आहात. एकदा का या जयकांत नामक गिधाडाला चमच्यांचं बळ मिळालं की तुमच्या दुकानाची गय नाही! त्यापेक्षा सुरुवातीपासूनच अशा जयकांत वृत्तीतील भिकार गिधाडाला थोपवा, त्याचं समर्थन करू नका. त्याला सामाजिक प्रतिष्ठा देऊ नका! जर कोणी अशा छुटपूट जयकांतला जवळ करत असेल तर त्यालाही तुमची ‘सिंघम’ स्टाईल दाखवा आणि सुनवा चार शब्द. तो सो कॉल्ड जयकांत म्हणजे कोणी राक्षस नव्हे. तो एक बुजगावणं आहे. त्यात भुस्सा भरलाय. तो खरंच ताकदवान आणि खमया आहे तर, मग त्याच्या अवतीभवती कशाला हवी टपोरी पोरांची पिलावळ! तुम्ही-आम्ही रात्री-अपरात्री आणि दिवसाढवळ्या एकटे फिरतो. ज्याला तुम्ही आम्ही खतरनाक, भयनाक असा गुंड म्हणतो तो तुम्हाला एकटा फिरताना दिसला का? रात्रीचं सोडा, त्याला दिवसाही भिती वाटत असते! म्हणूनच तो भिकार टपोर्यांची फौज घेऊन फिरत असतो. हे टपोरी सुद्धा फार ताकदीचे नसतात! जोरात खेकसलात तरी ही कुत्र्यांची फौज देखील धूम ठोकते. पण, तुम्ही मनाचा निर्धार करून या जमातीच्या विरोधात पुढे याल त्याचवेळी हे सारं होईल!
COMMENTS