मुंबई / नगर सह्याद्री - सातत्याने कोणत्या ना कोणत्या विधानांवरून चर्चेत असलेल्या बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या अडच...
मुंबई / नगर सह्याद्री -
सातत्याने कोणत्या ना कोणत्या विधानांवरून चर्चेत असलेल्या बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांवर केलेल्या विधानाप्रकरणी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते राहुल कनाल यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी केली आहे. राहुल कनाल यांनी पोलिसांना पत्र लिहून धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात साईबाबा यांच्या विरोधातील वक्तव्यासाठी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या वांद्रे पोलीस स्थानकात ही तक्रार राहुल कनाल यांनी दाखल केली आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून साई बाबांबद्दल लोकांच्या मनात आस्था असून कोणालाही त्यांच्याविरोधात असे वक्तव्य करने टाळले पाहिजे. राहुल कनाल हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेता असून ते शिर्डी साई संस्थानाचे माजी विश्वस्त देखील आहेत.
दरम्यान, बागेश्वर बाबा उर्फ पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचं आयोजन २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये करण्यात आलं होतं. यात बोलतांना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही.
आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही. आपले परात्पर गुरु शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवाचा दर्जा दिला नसल्याचंही ते म्हणाले होते. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान असल्याचं धीरेंद्र शास्त्री यावेळी बोलताना म्हणाले होते.
COMMENTS