अहमदनगर | नगर सह्याद्री केंद्रातील भाजप सरकारचे चुकीचे व भांडवलदार हिताचे आर्थिक धोरण आहे. महागाई, आर्थिक व सामाजिक विषमतेचा सामना सर्वसामान...
अहमदनगर | नगर सह्याद्री
केंद्रातील भाजप सरकारचे चुकीचे व भांडवलदार हिताचे आर्थिक धोरण आहे. महागाई, आर्थिक व सामाजिक विषमतेचा सामना सर्वसामान्य नागरिक करत आहेत. देशाची संपत्ती भांडवलदारांच्या स्वाधीन करण्यासाठी जातीय तणाव निर्माण करुन लक्ष विचलित करण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. जनतेवर हिंदुत्व लादण्यासाठी घटनेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांनी केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बुरुडगाव रोड येथील पक्ष कार्यालयात भाजप हटाव... देश बचाव या जनजागरण मोहीमेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत कॉ. कानगो बोलत होते. यावेळी भाकपचे राज्यसचिव अॅड.कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ. बन्सी सातपुते, राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. स्मिता पानसरे, जिल्हा सहसचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा सहसचिव सुधीर खोडदे, सुलाबाई आदमाने आदी उपस्थित होते. कॉ. कानगो म्हणाले की, भाकपने सर्व डाव्या चळवळीतील पक्ष, संघटनांना बरोबर घेऊन ही जनजागरण मोहीम सुरु केली आहे. याला भाजप विरोधी इतर राजकीय पक्षांचा देखील पाठिंबा आहे. देशात आजही भाजपची ताकद नाही, तोडून-फोडून सरकार राज्यात आणण्याचे काम केले जात आहे.
महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यातही अशा पध्दतीने सत्ता ताब्यात ठेवण्यात आली आहे. इडी व सीबीआयचा वापर करुन विरोधकांमध्ये धाक निर्माण करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीचा खर्च वाढला, मात्र मालाला भाव नाही, सरकार योग्य हमीभाव देण्यास तयार नाही. यामुळे शेतकर्यांमध्ये असंतोष आहे. नवीन कामगार कायद्यामुळे कामगार भांडवलदारांच्या दावणीला बांधले जात असताना त्यांच्यातही असंतोष आहे. बेरोजगारीमुळे युवकांमध्ये असंतोष आहे. जनता त्रस्त बीजेपी मस्त! ही देशाची वस्तुस्थिती झाली आहे. याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना जागरूक करण्याचे काम या जनजागरण मोहीमेतून होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून मोहीमेचा प्रारंभ होणार असल्याचे कानगो यांनी सांगितले. प्रास्ताविकात संतोष खोडदे यांनी भाजप हटाव... देश बचाव! ही देशव्यापी मोहीम जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते या मोहिमेच्या प्रचार पत्रकांचे अनावरण करण्यात आले.कॉ. बन्सी सातपुते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर १९४९ साली पहिल्यांदा शेतकरी वर्गावर गोळीबार होवून शेतकरी शहीद झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील एरंडगाव (ता. शेवगाव) येथून या मोहीमेचा प्रारंभ तर दुसरे ठिकाण असलेले राजापूरला (संगमनेर) १५ मे रोजी याचा समारोप होणार आहे.
अॅड. कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भाजप सत्तेवर आले. मात्र त्यांनी दाखवलेले स्वप्न पूर्ण करता आले नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक, प्रांतवाद, महापुरुषांची बदनामी आदी गैरमुद्दे उपस्थित करुन जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे.
COMMENTS