संगमनेर | नगर सह्याद्री सरकारी योजनेतील कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास येथून पुढे आधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल. ठेकेदारांच्या भ...
संगमनेर | नगर सह्याद्री
सरकारी योजनेतील कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास येथून पुढे आधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल. ठेकेदारांच्या भरवश्यावर कोणत्याही योजनेची कार्यवाही करु नका, आता सरकार बदलले आहे याची जाणीव ठेवून तलाठी आणि ग्रामसेवकांनी सामान्य माणसाच्या हिताचा कारभार करावा, उगाच ठेकेदारांची चिंता करीत बसू नका अशा शब्दात महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत खडेबोल सुनावले.
तालुयातील जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठकीचे आयोजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. वडगावपान आणि समनापुर या जिल्हा परिषद गटांची बैठक तळेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंत्री विखे पाटील यांनी गावनिहाय समस्यांचा आढावा घेवून या कार्यवाही करण्याच्या सुचना विविध विभागांच्या आधिका-यांना दिल्या. याप्रसंगी प्रांताधिकारी शशिकांत मगंरुळे, गटविकास आधिकारी नागणे यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे आधिकारी उपस्थित होते.उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याच्या समस्या उपस्थित केल्या.
२१ गावांसाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तलावाला बंधिस्त कुंपन झाली आहे अशी मागणी करण्यात आली. या योजनेला फिल्टर प्लॅन्ट नसल्याने अशुध्द पाणी प्यावे लागत असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांनी अतिशय गांभिर्याने घेवून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. पिंपळे आणि पाच गावांसाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून दुषित पाणी येत असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. पाणी पुरवठा योजनेकरीता जीवनधारा तळेगाव प्रादेशिक योजना समिती विरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्यामुळे ही समिती तातडीने बरखास्त करण्याची सुचना मंत्री विखे पाटील यांनी गटविकास आधिका-यांना दिली.
तळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी निळवंडे धरणातून पाणी उध्भव घेता येईल का याचे सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आधिका-यांना दिल्या.पारेगाव येथील निवृत्ती महाराजांचा पालखी सोहळा मार्गासाठी तातडीने सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना मंत्र्यांनी दिल्या. तसेच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने यापुर्वी नुकसान झालेल्या पिकांची भरपाई अद्यापही मिळालेली नाही ही बाबही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. बहुतांशी शेतक-यांनी तलाठी आणि ग्रामसेवकांच्या संदर्भात केलेल्या तक्रारींचे गांभिर्य लक्षात घेवून या तक्रार आलेल्या तलाठ्यांची चौकशी करुन, एक महिन्यात कारवाई करण्याची निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, १ मे पासून शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रकरणं मार्गी लावण्यासाठी आधिका-यांनी सजगतेने काम करावे, योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी शासन आपल्या दारी योजनेची पुर्व कल्पना नागरीकांना द्यावी, १ मे पासूनच आता शासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता कोणाचीही अडचण होणार नाही असे स्पष्ट करुन, जमीन मोजणीची तालुयातील ८०० प्रकरणं लवकर निकाली काढण्यासाठी रोव्हर्स मशिनची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रलंबित प्रकरण जून अखेर पर्यंत मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
शेतशिवार आणि पाणंद रस्त्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आल्या असून या रस्त्यांची कामेही विहीत वेळेनुसार मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सरकार हे जनतेसाठी काम करणारे आहे. त्यामुळे शासकीय आधिकारी आणि कर्मचा-यांनी सुध्दा जनतेच्या हिताचा विचार करावा. तालुयात यापुर्वी चिठ्ठ्यावर कारभार चालू होता, तो आता बंद करा. कोणाच्या कार्यालयात जावून काम करण्यापेक्षा सरकारी कार्यालयातच बसून कामकाज करा. कोणाचाही दबाव आला तरी चिंता करु नका. कारण अवैध धंदे बंद केल्यामुळे उद्योगी लोकांची चिंता वाढली आहे. अनियमित आणि नियमबाह्य कामकाजासाठी कोणाला जरी तुम्ही पाठीशी घातले तरी कारवाईला सामोरे जावे लागेल अशा कडक शब्दात त्यांनी आधिकारी कर्मचा-यांना तंबी दिली.
COMMENTS