नगर बाजार समितीसाठी ९९ टक्के मतदान / मविआची भाजप विरोधात घोषणाबाजी | गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार सुनील चोभे / नगर सह्याद्...
नगर बाजार समितीसाठी ९९ टक्के मतदान / मविआची भाजप विरोधात घोषणाबाजी | गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
सुनील चोभे / नगर सह्याद्री -
नगर बाजार समितीच्या १६ जागांसाठी सुरू असलेल्या मतदाना दरम्यान भाजपने मतदारांना बसमधून मतदान केंद्राच्या गेटजवळ आणल्यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांनी विरोध करत बस अडविल्या. त्यामुळे मतदान केंद्रासमोर महाविकास आघाडीचे समर्थक व कर्डिले समर्थकांमध्ये जुंपली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बस मतदान केंद्रापासून लांब नेण्यास सांगितल्या. त्यास कर्डिले समर्थकांनी विरोध केल्याने दोन्ही गटात चांगलीच बाचाबाची झाली. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केले. गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. गर्दी पांगल्याने मोठा अनर्थ टळला. नगर बाजार समितीसाठी ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सर्व बाजार समितींवर भाजपचा विजय होईल:कर्डिले
नगर बाजार समिती निवडणुकीत तालुक्यात महाविकास आघाडी वीस वर्षापासून एकत्र आहे. या निवडणुकीत आमदार नीलेश लंके व आमदार प्राजक्त तनपुरे एकत्र आले असले तरी तीन वर्षातील त्याचा व महाविकास आघाडीचा राज्यातील कारभार जनेतेने पाहिला आहे. फक्त निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप करुन स्वतःची प्रसिद्धी करणे, यापेक्षा दुसरे भांडवल महाविकास आघाडीकडे नाही. नगर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांवर भाजपचा विजय होईल, असा विश्वास भाजपचे नेते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केला.
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (दि.२८) १६ जागांसाठी गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालयात मतदान सुरू होते. सकाळीच मतदानासाठी भाजपने मतदारांना बसमधून आणले. मतदान केंद्रासमोर बस आल्या असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बस पुढे जाण्यास विरोध केला. तसेच बस मागे घ्या, असे म्हणून जोरदार घोषणाबाजी केली. त्यास कर्डिले समर्थकांनीही विरोध केला. त्यामुळे महाविकास आघाडी व कर्डिले समर्थकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडून काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले. दरम्यान तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि भान्सी, सपोनि कैलास वाघ, उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी व पोलिस कर्मचार्यांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या समर्थकांना शांत केले. सोम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली. त्यानंतर मतदान शांततेत व सुरळीत सुरु झाले.
नगर बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित; प्रा. गाडे
गेल्या पंधरा वर्षापासून माजी खासदार कै. दादा पाटील शेळके व आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. नगर तालुक्यातील महाविकास आघाडी सक्षम आहे. पंधरा वर्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात येईल. मतदार सुज्ञ आहेत. तालुक्यात स्व. शेळके यांनी उभ्या केलेल्या संस्था कर्डिले यांनी मोडीत काढल्या आहेत. त्यामुळे नगर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी व्यक्त केला.
बाजार समितीच्या निवडणुकीत कर्डिले गट व महाविकास आघाडीकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन झाल्याने मतदारांमध्ये उत्साह आहे. पहिल्या चार तासांत ४६.५३ टक्के मतदान झाले होते. सोसायटी मतदारसंघात 1394 पैकी 1378, ग्रामपंचायत मतदारसंघात 1011 पैकी 1000, तर हमाल मापाडी मतदारसंघात 273 पैकी 269 मतदान झाले. एकूण 98. 80 टक्के मतदान झाले. आनंद विद्यालयात ९ बुथवर सकाळी ८ ते दुपारी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. चुरशीचे मतदान झाल्यामुळे बाजार समिती निवडणुकीत कर्डिले-कोतकर गट बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजार समितीवर झेंडा फडकविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मतदान शांततेत पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर तालुका उपनिबंधक देविदास घोडेचोर यांनी सांगितले. मतमोजणी शनिवारी (दि. २९) सकाळी ९ वाजता नगर कल्याण रस्त्यावरील नेप्ती शिवारातील अमरज्योत मंगल कार्यालयात होणार आहे.
COMMENTS