अहमदनगर | नगर सह्याद्री- जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असतांनाही खासदार सुजय विखे पाटील व भाजप नेते शिव...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असतांनाही खासदार सुजय विखे पाटील व भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी करिष्मा दाखवत बँकेवर भाजपचा झेंडा फडकवला. कर्डिले स्वतः अध्यक्षपदी विराजमान झाले. या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला चांगलाच झटका बसला. जिल्हा बँक अध्यक्षपदाचा वचपा काढण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील महाविकास आघाडी नगर बाजार समिती निवडणुकीत बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी सावधानता बाळगत सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके नगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या १८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्यात भाजप नेते कर्डिले-माजी सभापती भानुदास कोतकर गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. महाविकास आघाडीने रात्रीतून उमेदवार बदलत विठ्ठल दळवी यांना अधिकृत तर किसन सानप यांना पृरस्कृत उमेदवार केले आहे. चिन्ह वाटपात कर्डिले-कोतकर गटाला कपबशी तर महाविकास आघाडीला छत्री चिन्ह मिळाले आहे.बाजार समिती निवडणुकीत चौकार मारण्यासाठी कर्डिले-कोतकर गटाकडून जय्यत तयारी चालविली आहे. सत्ताधार्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी शड्डू ठोकून आहे. त्यातच नगर तालुका बाजार समितीमध्ये तालुक्याबाहेरील नेतेमंडळींनी विधानसभा, लोकसभा डोळ्यासमोर ठेवून पहिल्यांदाच लक्ष घातल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडीकडून तालुक्यातील चर्चेतील चेहरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने याचा मतदारांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नेते मंडळींकडून इच्छुक उमेदवारांची मनधरणी
नगर बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात १८ जागांसाठी २२८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, कर्डिले-कोतकर यांनी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जुन्या-नव्यांचा ताळमेळ घालत, तालुक्यातील धनिकांना भाव देत, तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निष्ठावंतांना ऐनवेळी माघारी घ्यावी लागली. उमेदवारी न मिळाल्याने नाराजांची मनधरणी करण्याचे काम दोन्ही गटाकडून केले जात आहे. उमेदवारी जाहीर झाल्याने व चिन्ह मिळाल्याने सोशल मिडीयावर चिन्ह, फोटो, प्रचारगीत यांनी धुमाकूळ घातला आहे.
COMMENTS