६ आरोपींसह ९० हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त | पारनेर पोलीसांचे कोम्बो ऑपरेशन पारनेर | नगर सह्याद्री १२ एप्रिल रात्री ते १३ एप्रिल रोजी पह...
६ आरोपींसह ९० हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त | पारनेर पोलीसांचे कोम्बो ऑपरेशन
पारनेर | नगर सह्याद्री
१२ एप्रिल रात्री ते १३ एप्रिल रोजी पहाटे दरम्यान नगर कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या येथील प्रसिध्द श्री हरेश्वर मंदिरासमोरील दानपेटी फोडुन दानपेटीमधील सुमारे ४ हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली होती. या घटनेबाबत अनिल भाऊसाहेब कुठे (रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ९० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.
गुन्हयाचा तपासात पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पथक यांनी कोम्बो ऑपरेशन राबवून तपासाची चक्रे फिरविली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती संकलीत करून आरोपी ताब्यात घेण्यात आले.
मंदिरातील दानपेटी फोडून दुसरा गुन्हा करण्याच्या तयारीत असणारे आरोपी भरत मचिन्द्र माळी (वय २५, रा. शिरढोण ता. जि. अहमदनगर, मूळ रा. लोणी मय्यद, ता. आष्टी), लक्ष्मण किसन बर्डे (वय २३, रा शिराढोण ता. जि. अहमदनगर), सुरेश सुदाम बर्डे (वय ३५, रा. आंबरेवाडी, ता. जि. अहमदनगर), रविंद्र अशोक वाघ (वय ३१, रा. शिराढोण), दत्तू उर्फ अरुण पवार (वय १९, रा. बेनवडी, ता. कर्जत), किरण विलास पवार (वय २५, रा. पदमपुरवाडी ता. जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली. त्यांचे तीन साथीदार निष्पन्न करण्यात आले आहेत.
आरोपींकडुन रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहने व हत्यार आणि इतर असा एकूण ९० हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोना एन. पी. साळवे करत आहेत. या आरोपींवर नगर, श्रीगोंदा, पारनेर, सुपा पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेप्रमाणे पोहेकॉ संदीप गावापा, सुधीर खाडे, पोलीस पोना गहिनीनाथ यादव, पोना आप्पासाहेब डमाळे, पोकों सुरज कदम, पोकॉ सत्यजित शिंदे, पोकॉ सागर धुमाळ, पोकॉ विवेक दळवी, पोकॉ सारंग वाघ व पोकॉ प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.
COMMENTS