भाजप नेते शिवाजी कर्डिले, महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांची प्रतिष्ठा पणाला सुनिल चोभे | नगर सह्याद्री नगर बाजार समितीत पंधरा...
भाजप नेते शिवाजी कर्डिले, महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांची प्रतिष्ठा पणाला
नगर बाजार समितीत पंधरा वर्षापासून भाजप नेते शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांची असलेली एकहाती सत्ता उलथून टाकण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी जिल्हा परिषदेच्या शिलेदारांना रिंगणात उतरुन कडवे आव्हान दिले आहे. त्यामुळे कर्डिले-कोतकर बाजार समितीचा चौकार मारतात की मतदार गाडे यांचे चौथ्यांदा नेतृत्व नाकारतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खा. विखे, आ. लंके, आ. तनपुरे,शेलार यांच्याकडून साखर पेरणी
पहिल्यांदाच नगर बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्याबाहेरील नेते मंडळींनी लक्ष घातल्याने निवडणूक चुरशीची झाली. खासदार सुजय विखे पाटील व आमदार नीलेश लंके यांच्याकडून लोकसभेच्या अनुषंगाने व्यूव्हरचना आखली जात आहे. आमदार लंके, आ. प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार यांच्याकडून आपापल्या मतदारसंघातील नगर तालुक्यातील गावांत प्रचार केला जात आहे. खासदार विखे, आ. लंके, आ. तनपुरे, शेलार यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नगर तालुक्यात साखर पेरणी केली आहे.
महाविकास आघाडीची भिस्त आ. लंकेंवरच
गेल्या पंधरा वर्षापासून नगर तालुका महाविकास आघाडी भाजप नेते शिवाजी कर्डिले यांना विरोध करत आहे. यंदा मात्र आमदार लंके, आमदार तनपुरे, घनश्याम शेलार यांनी लक्ष घातल्याने तसेच आपले उमेदवारही रिंगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीकडून तब्बल सात उमेदवार आमदार लंके यांचे आहेत. चार शिवसेना व चार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे नगर बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची सर्व भिस्त आमदार लंके यांच्यावर असून निवडणुकीत कितपत यश येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यावर्षीही तोच संघर्ष, तेच मुद्दे आहेत. आघाडीकडून संदेश कार्ले, शरद झोडगे, उद्योजक अजय लामखडे, अंकुश शेळके, उद्धव दुसुंगे, संपतराव म्हस्के, रोहिदास कर्डिले ही मातब्बर मंडळी रिंगणात आहेत. भाजपकडून माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, भाऊसाहेब बोठे, संतोष म्हस्के, संजय गिरवले, सुधीर भापकर हे मातब्बर रिंगणात आहेत. भाजपकडून सुरक्षितता म्हणून मतदारांना सहलीवर रवाना केले आहे. चोथ्यांदा पुन्हा सत्ता आणण्यासाठी कर्डिलेंबरोबरच माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या पडद्यामागून जोरदार हालचाली सुरु आहेत. असे असले तरी दोन्ही गटाकडून बाजार समितीच्या सत्तेवर दावा सांगितला जात आहे.
COMMENTS