ऑक्सिजन पार्क, विद्यूत रोषणाई करणार अहमदनगर | नगर सह्याद्री शहरातील ड्रेनेज, अतिक्रमणे यामुळे रया गेलेल्या सीना नदीचे रूप पालटणार आहे. आ. स...
ऑक्सिजन पार्क, विद्यूत रोषणाई करणार
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरातील ड्रेनेज, अतिक्रमणे यामुळे रया गेलेल्या सीना नदीचे रूप पालटणार आहे. आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सीना नदी सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सीनेच्या कडेला ऑक्सिजन पार्कसह विविध सुशोभीकरणाची कामे यातून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
शहरातून वाहणार्या सीना नदीचे सुशोभीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी आ. जगताप यांनी सातत्याने प्रयत्न केले. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सीना नदी सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केवळ निधी मंजूर केला, असे नाही तर राज्याच्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे. मंजूर केलेल्या एक कोटीपैकी वीस लाखांचा निधी जिल्हाधिकार्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम होणार आहे.
पुणे हायवे ते फुलसुंदर मळा या परिसरातून जाणार्या सीना नदीचे सुशोभीकरण यात करण्यात येणार आहे. शहरातील ड्रेनेज, सांडपाणी यामुळे सीना नदीकाठच्या लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यातच काही ठिकाणी बांधकाम साहित्य टाकल्याने आणि अतिक्रमण झाल्याने विद्रुपीकरणही झालेले आहे. शहराच्या विकासात सीना नदीचे सुशोभीकरण हा महत्त्वाचा विषय आहे. विविध कार्यक्रमांतही सीना नदीच्या दुरवस्थेवरून अनेकदा चर्चा झालेली आहे. हे जरी खरे असले तरी सीनेच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता महापालिकेच्या तिजोरीतून यासाठी निधी उपलब्ध होणे अशक्य होते. त्यामुळे राज्य सरकारकडे यासाठी निधी मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केल्याचे आ. जगताप म्हणाले. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या निधीतून सीना नदीचा काही भाग सुशोभीत करण्यात येणार आहे.
पुणे हायवे ते फुलसुंदर मळा या टप्प्यातील सुशोभीकरणात ऑक्सिजन पार्क उभारणे, वृक्षारोपण करणे, पाथ वे (जॉगिंग ट्रॅक), लहान मुलांसाठी खेळणी बसविणे, आकर्षक विद्यूत रोषणाई करणे, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळासाठी ठिकाणे निर्माण करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यातील वृक्षारोपणासाठी शहरातील नागरिकांनीही पुढेै येण्याची गरज आहे. वृक्षारोपण करतानाच लावलेल्या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारीही नागरिकांसह शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी घ्यावी, असे आवाहनही आ. जगताप यांनी केले आहे.
COMMENTS