बाजार समिती निवडणुकीत इच्छुकांची संख्या वााढल्याने नेत्यांची डोकेदुखी | माघारीकडे लक्ष सुनिल चोभे | नगर सह्याद्री माजी खासदार दादा पाटील श...
बाजार समिती निवडणुकीत इच्छुकांची संख्या वााढल्याने नेत्यांची डोकेदुखी | माघारीकडे लक्ष
सुनिल चोभे | नगर सह्याद्री
माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा नेते शिवार्जी कर्डिले यांच्या विरोधात पुन्हा एकदा नगर तालुका महाविकास आघाडीने शड्डू ठोकला आहे. दोन्ही पॅनेलकडून बाजार समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारीसाठी भाजप नेते कर्डिले साहेबांकडे आणि महाविकास आघाडीचे नेते गाडे सरांकडे विनवणी करीत आहेत. असे असले तरी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी २२८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. भाजप नेते कर्डिले-कोतकर गटाकडून सुप्रिया कोतकर, माजी उपसभापती संतोष म्हस्के, रेवनणाथ चोभे, भाऊसाहेब बोठे, रभाजी सूळ, सुधीर भापकर, मंजाबापू घोरपडे, अनिल करांडे यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. महाविकास आघाडीकडून अंकूश शेळके, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, उद्योजक अजय लामखडे, संपतराव म्हस्के, केशव बेरड, शरद झोडगे, भाऊसाहेब काळे यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. दोन्ही गटाकडून अजून कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, २० एप्रिलनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी दोन्ही गटाकडील संभाव्य उमेदवारांनी नगर तालुका पिंजून काढला आहे. तसेच नेतेमंडळींनी मतदारांच्या भावना जाणून घेतल्या आहेत.
उमेदवारीसाठी भाऊंना साकडे
बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेते शिवाजी कर्डिले-माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या विरोधात नगर तालुका महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. कर्डिले-कोतकर गटाकडून उमेदवारी करणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार भाऊंना भेटून साहेबांच्या दरबारी हजेरी लावत आहेत. बाजार समितीतील बहुतांश माजी संचालक पूर्वीश्रमीचे कोतकर यांचे एकनिष्ठ आहेत. भाऊंच्या आदेशाने त्यांनी जोमात प्रचारही सुरु केला आहे.
आघाडीच्या पाच शिलेदारांनी वाढविली कर्डिलेंची डोकेदुखी
यंदा महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश काले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, उद्योजक अजय लामखडे, माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू अंकूश शेळके यांनी उमेदवारी केली आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक आणखीन रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. या पाच जणांच्या शिलेदारांमुळे भाजप नेते कर्डिले यांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे.
आमदार लंके, तरपुरेेंचे समर्थक रिंगणात
नगर तालुक्यातील काही गावांचा समावेश आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे बाजार स मितीच्या निवडणुकीत आमदार लंके, तनपुरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या दोघांनीही आमदार झाल्यापासून नगर तालुक्यात स्वतंत्र गट तयार केला आहे. तसेच बाजार समितीच्या निवडणुकीत आमदारांनी त्यांच्या समर्थकांना रिंगणात उतरविल्याने निवडणुकीत आणखी रंगत आली आहे. शुक्रवारी होणार्या मेळाव्यात आमदार लंके व तनपुरे काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शुक्रवारी फुटणार आघाडीचा नारळ
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपाचे नेते शिवाजी कर्डिले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बाजार समिती प्रचाराचा नारळ रुईछत्तीशी येथे फोडला. नगर तालुका महाविकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि. १४) नक्षत्र लॉन येथे होणार आहे. या मेळाव्यास आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
COMMENTS