पारनेर तालुक्यातील जवळा येथे धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी तीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पारनेर । नगर सहयाद्री - पारनेर तालुयातील जवळा य...
पारनेर तालुक्यातील जवळा येथे धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी तीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
पारनेर । नगर सहयाद्री -
पारनेर तालुयातील जवळा येथे पठारे वस्तीवर दहा ते बारा जणांच्या अज्ञात टोळीने सशस्त्र धाडसी दरोडा टाकत गळ्याला सुरा लावत घरातील महिलांना मारहाण करुन दागदागिने व रोख रकमेसह तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविला.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी; गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास पठारे वस्तीवर राहणार्या रंजना शहाजी पठारे व त्यांच्या सुनबाई आणि तीन वर्षाचा लहान मुलगा शेतीची दैनंदिन कामे उरकून जेवण करून झोपले होते. रात्री दीड वाजेच्या दरम्यान दहा ते बारा चोरटे काळे कपडे, माकडटोप्या व हातमोजे परिधान करुन आले.
चोरट्यांनी ग्रीलचा दरवाजा कटावणीने तोडून घराच्या मुख्य दरवाजाला दहा ते पंधरा किलोचा जात्याचा दगड मारून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. मोठा आवाज झाल्याने रंजनाबाईना जाग आली. प्रथम भांबावलेल्या अवस्थेत त्यांना काही सुचेना. इतके लोक कसे काय घरात आले समजेना. तेवढ्यात दरोडेखोरांनी मोबाईल काढून घेत दोन्ही महिलांच्या मानेला सुरा लावत गप्प बसण्यास सांगितले. जवळ जे काही असेल ते काढून द्या, नाही तर खलास करून टाकू व तुमच्या बाळाला फेकून देऊ, असे म्हणत दमदाटी करून मारहाण करू लागले.
यावर रंजनाबाईनी तुम्हाला हवे ते न्या पण आमच्या बाळाला व आम्हाला मारू नका म्हणत अंगावरचे सर्व सोन्याचे दागिने काढून दिले. त्यानंतर काही चोरट्यांनी आतल्या खोलीत प्रवेश करत कपाटांची तोडफोड करून उचका पाचक करत सुमारे दहा ते बारा तोळे सोने, रोख रक्कम असा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच नुकतेच पारनेरला रुजू झालेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. परिसथितीची पाहणी करत तपासाच्या दृष्टीने सुत्रे फिरवली. श्वान पथक, ठसेतज्ज्ञ यांची मदत घेत तपास चालू केला आहे. हातमोजे, पायमोजे, माकड टोप्या घालून आले होते, यावरून ते सराईत दरोडेखोर असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जाताना चोरट्यांनी घरातील कुकर, खुराड्यातील कोंबड्या, अंडी, मसाल्याचे डबेही नेले.
COMMENTS