अहमदनगर | नगर सह्याद्री दोन आठवड्यांपूर्वी दरवाढीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार्या रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांनी...
अहमदनगर | नगर सह्याद्री
दोन आठवड्यांपूर्वी दरवाढीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार्या रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष तेथे तथा माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरातांना या प्रश्नी लक्ष घालण्याचे साकडे घातले आहे. शहर काँग्रेस कार्यालयात आले असता थोरात यांची शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने भेट घेत आपली कैफियत मांडली आहे.
यावेळी कामगार प्रतिनिधी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, अमर डाके, रोहिदास भालेराव, दिपक काकडे, संदीप कार्ले, नाना दळवी, बाबासाहेब वैरागर, जयराम आखाडे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांनी थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून आम्ही दरवाढ अंमलबजावणीसाठीचा पाठपुरावा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे करीत आहोत. तत्कालीन अधिकार्यांनी दरवाढीचा निर्णय जारी केला होता. मात्र नवीन आलेल्या अधिकार्यांनी त्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. याबाबत न्यायालयामध्ये हुंडेकरी आणि कामगार दोघांच्या वतीने दावे दाखल करण्यात आले होते.
मात्र हुंडेकर्यांचा दावा फेटाळून लावण्यात आला असून अंमलबजावणी करत असल्याचे न्यायालयात सांगून देखील कामगार कार्यालय अंमलबजावणी करण्यास तयार नसल्याची कैफियत यावेळी कामगारांनी मांडली. दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या उपोषणावेळी एक महिन्याच्या आत अंमलबजावणी करणार असल्याचे लेखी आश्वासन कामगारांना देण्यात आले आहे. मात्र आश्वासनाची पूर्तता होण्याबाबत कामगार बांधवांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे त्यांनी आ. थोरातांना लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
आ. थोरातांनी या संदर्भात कामगार आयुक्तांशी बोलून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले आहे. काँग्रेस कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल राहुल सावंत, जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल दशरथ शिंदे, अनिस चूडीवाला, संजय झिंजे, उषाताई भगत तसेच नगर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विकास भिंगारदिवे यांना आ.थोरातांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र नागवडे यांचा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ.लहू कानडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके आदींसह शहर व जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.
COMMENTS