खा. विखे, आ. लंकेंसाठी लोकसभेची रंगीत तालीम / बाजार समिती निवडणुकीत मतदारांना लक्ष्मी दर्शनाची चर्चा; शुक्रवारी मतदान शरद झावरे | नगर सह्या...
खा. विखे, आ. लंकेंसाठी लोकसभेची रंगीत तालीम / बाजार समिती निवडणुकीत मतदारांना लक्ष्मी दर्शनाची चर्चा; शुक्रवारी मतदान
शरद झावरे | नगर सह्याद्री
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी व भाजपच्या जनसेवा पॅनलमध्ये प्रचाराची राळ उडाली आहे. ही निवडणूक म्हणजे खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार नीलेश लंके यांची लोकसभेची रंगीत तालीम तर नाही ना, असा प्रश्न पारनेर तालुयात निर्माण झाला आहे. दोन्ही पॅनल कडून मतदारांना लक्ष्मी दर्शन झाल्याचीही चर्चा आहे. याचे अनेक किस्सेही पुढे येऊ लागले. शेतकर्यांची कामधेनू असलेल्या बाजार समितीमध्ये शेतकर्यांना मूलभूत सुविधा कशा दिल्या जातील, निघोज व टाकळी ढोकेश्वर उपबाजार कधी सुरू होणार असे अनेक प्रश्न आहेत.
तांबे, शेळकेंच्या पाठिंब्यामुळे विखे गटाची ताकद वाढली
पारनेर बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही पॅनेलकडून मोठी ताकद लावण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके यांनी खासदार सुजय विखे प्रणित जनसेवा सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा दिल्याने पारनेरमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत विखे गटाची ताकद वाढली आहे. तांबे, शेळके यांनी त्यांची यंत्रणा संपूर्ण तालुक्यात सक्रिय झाल्याने याची मोठी मदत विखे गटाला होणार असल्याचे बोलले जात आहे.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात असून शुक्रवारी (दि. २८) यासाठी मतदान आहे. निवडणुकीत भाजप प्रणित जनसेवा पॅनलचे नेतृत्त्व खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुजित झावरे, राहुल शिंदे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील थोरात, माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी सभापती गणेश शेळके, बाबासाहेब तांबे, डॉ. भाऊसाहेब खिलारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट असलेल्या महाविकास आघाडीचे नेतृत्व माजी आमदार विजय औटी यांच्यासह आ. नीलेश लंके, माजी सभापती राहुल झावरे, मधुकर उचाळे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, ज्येष्ठ नेते मारुती रेपाळे, सुदाम पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते करत आहेत.
अनेक दिग्गज रिंगणात
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक सावंत, माजी सभापती प्रशांत गायकवाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे यांच्या पत्नी पद्मजा पठारे, ज्येष्ठ नेते किसनराव रासकर, अशोक कटारिया, नगरसेवक अशोक चेडे, सुरेश पठारे, अरुणराव ठाणगे, शिवाजी खिलारी, अमोल साळवे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, सरपंच लहू भालेकर यांच्यासह अनेक दिग्गज दोन्ही पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आहेत.
बाजार समिती निवडणुकीत आ. लंके व माजी आमदार विजय औटी यांनी महाविकास आघाडी करून भाजपचे खासदार सुजय विखे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आजी-माजी आमदार एकत्र आल्याने त्यावर भाजप खा. सुजय विखे यांनी हल्लाबोल केला. यामागे षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी या तीनही दिग्गजांच्या दृष्टीने बाजार समिती निवडणूक प्रतिष्ठेची आहे. खा. विखे यांच्याकडून महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांना टीकेचे लक्ष केले जात आहे. आ. लंके व माजी आमदार विजय औटी,माजी सभापती राहुल झावरे यांच्याकडून भाजप खासदार सुजय विखे यांच्यासह जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, ठाकरे गटातून भाजप गोटात सामील झालेले माजी सभापती गणेश शेळके व बाबासाहेब तांबे यांच्यावर टीका केली जात आहे.
निवडणूक जरी बाजार समितीचे असली, तरी या निवडणुकीला लोकसभेची किनार असल्याची झलक दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नीलेश लंके किंवा त्यांच्या सुविद्य पत्नी राणीताई लंके प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यांची लढत भाजप खा. सुजय विखे पाटील यांच्याशी होण्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभेचा विरोधक म्हणून भाजप खा. विखे पाटील यांनी या निवडणुकीत लक्ष घातले.
COMMENTS