नगरमध्ये वाहनांच्या काचा फोडल्या | पोलिसांचा बंदोबस्त तैनात | ५० जणांवर गुन्हे अहमदनगर | नगर सह्याद्री- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजर...
नगरमध्ये वाहनांच्या काचा फोडल्या | पोलिसांचा बंदोबस्त तैनात | ५० जणांवर गुन्हे
अहमदनगर | नगर सह्याद्री-
छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर जवळ दोन समाजाच्या गटात मंगळवारी सायंकाळी उशिरा मोठा वाद झाला. या वादाचे रूपांतर तोडफोड व जाळपोळीमध्ये झाले. त्यानंतर इंद्रायणी हॉटेलजवळ हाणामारी, मुकुंदनगरजवळ महामार्गावर तुफान दगडफेक होऊन अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेमुळे शहर व उपनगर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वतः पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. रात्री उशीरा एसआयडीसी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे ५० जणांवर दाखल झाले आहेत.
रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गजराजनगर परिसरात झेंडे लावण्यात आले होते. त्यावरून दोन समाजाच्या गटात काहीसा तणाव निर्माण झाला होता. यातूनच मंगळवारी सायंकाळी उशिरा एका युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसर्या गटाच्या युवकांना मारहाण करण्यात आली. अवघ्या काही क्षणातच या वादाचे तीव्र पडसाद उमटले. जमावाने दोन वाहने जाळली. एका वाहनाची तोडफोड करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवले. हा वाद सुरू असतानाच इंद्रायणी हॉटेलजवळ एका युवकास गंभीर मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या महामार्गावर मुकुंदनगरजवळ मोठा जमाव जमा झाला. जमावाने महामार्गावरील ट्रक व इतर वाहनांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर तोफखाना पोलिसांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात झाला.
अफवांवर विश्वास ठेवू नका; एसपी
नगरच्या छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगरमध्ये दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असतानाच मुकुंदनगर परिसरातही दगडफेक झाली. या घटनांचा पोलिस कसून तपास करीत आहेत. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला स्वतः पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. या सर्व घटनेत दोन दुचाकी जाळण्यात आल्या. एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली. यात एक गंभीर जखमी झाला आहे. मुकुंदनगरजवळ झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेची वार्ता संपूर्ण शहरात पसरतात ठिकठिकाणी जमाव जमला होता. मध्य शहर व सावेडी उपनगर परिसरात काही ठिकाणी हनुमान चालीसा कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून रात्री उशिरा घटनेतील आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली.
रात्री उशीरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात संतोष साहेबराव कर्डिले (वय- २६ वर्ष, रा. कोतकर मळा वारुळवाडी, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रज्जाक नुर खुदा खान, अनुरुद्दिन अबुद्दीन शेख, जिशान कादीर खान व इतर ३० ते ४० जण (नावे माहीत नाही. सर्व रा. वारुळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कोतकर वारुळवाडी रोडवरील हॉटेल देवांस समोरुन स्विफ्ट कारमधून (एमएच १२, एफवाय ३००६) गजराज चौकाकडे जात असताना दहा ते पंधरा लोक जमलेले दिसले. त्यातील रोहन नंदू धोत्रे यास काय झाले असे विचारले. मी सागर ठोंबरे मित्र परिवाराचा फोटो स्टेटसला ठेवला म्हणून ही मुले मला शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले.
त्यातील रज्जाक, अनुरुद्दिन, जिशान यांनी व इतर ३० ते ४० जणांनी हाच मेन संतोष कर्डिले आहे, असे म्हणून स्विफ्ट गाडी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने फोडली. व फिर्यादीस मारहाण केली. तसेच दीपक बाणखेले, किरण मांजरे यांनाही मारहाण करून पळून जाताना शाईन मोटारसायकल पेटवून दिली. दुसरी फिर्याद रज्जक पनुरलहुद्दा खान (वय-२१ वर्ष, मूळ रा. उरखला जि. बलहामपू उत्तरप्रदेश, हल्ली रा. गजराजनगर) यांनी दिली असून अनोळखी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी नमाज पडून त्यांच्या घरी गजराजनगर येथे जात असताना पाच ते सहा जणांनी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र अमरुद्दीन शेख यास लाकडी दांडक्याने, व दगडाने मारुण जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS