राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीचे संकट कायम,वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा मुंबई। नगर सहयाद्री - मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांना अव...
राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीचे संकट कायम,वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
मुंबई। नगर सहयाद्री -
मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. एप्रिलमध्येही गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अजूनही हे संकट संपलेले नाही. हवामानतज्ज्ञयांनी दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिलपर्यंत हे संकट कायम राहील.
आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
13 ते 15 एप्रिल दरम्यान गारपीट होण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र विद्रभात कुठेही गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली नाही.
राज्यातील जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान विभागाने सांगितले की, नगर, पुणे, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव.येथे वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
COMMENTS