अमरावती | नगर सह्याद्री एकत्र काम करण्याची इच्छा आहे; पण इच्छा पुरेशी नसते. जागा वाटप, त्यामध्ये काही इश्यू याबाबत देखील पाहावे लागेल. मविआ ...
अमरावती | नगर सह्याद्री
एकत्र काम करण्याची इच्छा आहे; पण इच्छा पुरेशी नसते. जागा वाटप, त्यामध्ये काही इश्यू याबाबत देखील पाहावे लागेल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसे सांगू? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांनाच विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाविषयी मोठ्या चर्चा झडताना दिसून येत आहेत. त्याआधी शरद पवार यांनी जेपीसीवरुन घेतलेल्या भूमिकेवरुनही राजकीय वर्तुळातून विरोधाचा सूर उमटला होता. काँग्रेसकडून शरद पवार यांनी जेपीसीबाबत घेतलेल्या भूमिकेला विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जेपीसी आणि पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरुन घेण्यात आलेली मवाळ भूमिका मविआतल्या घटकपक्षांपेक्षा वेगळी होती. त्यामुळे यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी तर नाही ना, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरुन वावड्या उठल्या होत्या. अमरावतीत बोलताना शरद पवार म्हणाले, एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांचे वाटप, त्यामध्ये काही इश्यू याबाबत पाहवे लागेल. त्यामुळे मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसे सांगू? असा सवालच शरद पवारांनी उपस्थित केला.
केंद्र सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे, राज्यातील मविआमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे, यावर आपले काय मत आहे, यावर शरद पवार म्हणाले, भाजपला त्यांचे काम करू द्या, आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही योग्य वेळ आल्यानंतर घेऊ. कर्नाटक विधानसभेमध्ये काही जागा आम्ही लढवत असून अ्ॅड. आंबेडकर हे देखील आमच्यासोबत आहेत. त्यामुळे जागांबाबत कोणताही तिढा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी अ्ॅड. आंबेडकर यांनी आपली भेट घेतली, ती नेमकी कोणत्या विषयावर होती, असे त्यांना विचारले असता पवार यांनी ही माहिती दिली.
COMMENTS