भाजपचा 18 जागांवर दणदणीत मतांनी विजय अहमदनगर | नगर सह्याद्री - नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेते तथा अहमदनगर जिल्हा सहक...
भाजपचा 18 जागांवर दणदणीत मतांनी विजय
अहमदनगर | नगर सह्याद्री -
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेते तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले-माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने विजयाचा चौकार मारला आहे. कर्डिले-कोतकर गटाला १८ पैकी १८ जागा मिळाल्या. विजयाचा निकाल हाती येताच कर्डिले-कोतकर समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर जल्लोष करीत गुलालाची उधळण केली.
चांगल्या कारभारामुळे पुन्हा एकहाती सत्ता; शिवाजी कर्डिलेगेल्या पंधरा वर्षापासून नगर बाजार समितीवर एकहाती सत्ता आहे. या काळात बाजार समितीमध्ये केलेल्या चांगल्या कामामुळे मतदारांनी पुन्हा एकदा सत्ता ताब्यात दिली आहे. बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, माजी सभापती भानुदास कोतकर, युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली लढविली आणि मोठा विजय मिळवून दिला. सर्व १८ जागांवर विजय दणदणीत मतांनी उमेदवार विजयी झाले आहेत असे भाजपचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले. दरम्यान त्यांनी मतदारांची आभार मानले.
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूूक प्रक्रिया झाली. कर्डिले यांच्या गटाच्या व्यापारी मतदारसंघातील दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. त्यात सुप्रिया कोतकर, राजेंद्र बोथरा विजयी झाले होते. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. शनिवारी कल्याण रोडवरील अमरज्योत लॉन येेथे मतमोजणी झाली. सुरुवातीला हमाल मापाडी मतदारसंघातील मतमोजणी झाली.
कडिले-कोतकरांचे चोख नियोजननगर बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच तालुक्याबाहेरील व्यक्तींनी हस्तक्षेप केला होता. निवडणुकीमध्ये खासदार सुजख विखे, आमदार नीलेश लंके, प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार यांनी लक्ष घातले होते. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. कर्डिले यांनी निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन तब्बल १३०० मतदारांना सहलीवर पाठविले होते. कर्डिले-कोतकर गटाने निवडणुकीसाठी चोख नियोजन केल्यामुळे उमेदवारांचा १०० पेक्षा अधिक मतांनी विजय झाला.
कर्डिले-कोतकर गटाचे नीलेश सातपुते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर सेवा संस्था व ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण जागांची मतमोजणी झाली. यात ग्रामपंचायत व सोसायटी मतदासंघात भाजपचे उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. शेवटपर्यंत आघाडी कायम होती. असाच कल महिला, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती-जमाती व अनुसुचित जाती जमाती मतदारसंघात होता.
महाविकास आघाडीत संदेश कार्लेंनी घेतले सर्वाधिक मते
मतमोजणीच्या सुरवातीपासून कर्डिले-कोतकर गटाचे उमेदवार आघाडीवर होते. त्यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे उमेदवारी संदेश कार्ले, रोहिदास कर्डिले होते. क्रॉस मतदानामध्येही कार्ले, कर्डिले यांना महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाली. नगर तालुक्यातील असलेला जनसंपर्क यामुळे संदेश कार्ले यांना मते जास्त मिळाली. मात्र त्यांचा पराभव झाला.
सोसायटी सर्वसाधारणमध्ये ८०, महिला १८, इतर मागास प्रवर्ग ८, विमुक्त जाती/ भटक्या जमाती १४, ग्रामपंचायत सर्वसाधरण २९, महिला राखीव ३०, आर्थिक दुर्बलमध्ये २५ तर हमाल मापाडी मतदारसंघात ८ मते बाद झाली. एकूण २१२ मते बाद झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देविदास घोडेचार यांनी काम पाहिले. मतमोजणीवेळी नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता.
अशी मिळाली मते
सोसायटी मतदारसंघ (सर्वसाधारण) - राजू आंबेकर ७०७ (विजयी), रोहिदास कर्डिले ६१३, संदेश कार्ले ६४२, भाऊसाहेब काळे ५४४, संजय गिरवले ७४३ (विजयी), विठ्ठल दळवी ५१६, उद्धव दुसुंगे ५७०, सुभाष निमसे ७०८ (विजयी), केशव बेरड २०, सुधीर भापकर ७६१ (विजयी), भाऊ भोर ७०८ (विजयी), मधुकर मगर ७२२ (विजयी), संपतराव म्हस्के ५२८, अजय लामखडे ५०४, रामचंद्र शिंदे ८, रभाजी सुळ ७०१ (विजयी). सोसायटी मतदारसंघ (महिला)- सुरेखा कोठुळे १७, मनिषा घोरपडे ७९२ (विजयी), संगिता ठोंबरे ५९३, जयश्री लांडगे ५५४, आंचल सोनवणे ७६३ (विजयी). सोसायटी इतर मागास प्रवर्ग- शरद झोडगे ६०१, संतोष म्हस्के ७७१ (विजयी), भटक्या विमुक्त जाती / जमाती- धर्मनाथ आव्हाड ८०९ (विजयी), विठ्ठल पालवे ५५७. ग्रामपंचायत सर्वसाधारण- हरिभाऊ कर्डिले ५५४ (विजयी), शरद पवार ३८८, भाऊसाहेब बोठे ५३७ (विजयी), अंकूश शेळके ४५७, ग्रामपंचायत अनुसुचित जाती जमाती - सुरेखा गायकवाड ४३०, भाऊसाहेब ठोंबे ५४० (विजयी), आर्थिक दुर्बल घटक- प्रविण गोरे ४३३, दत्तात्रय तापकिरे ५४२ (विजयी), हमाल मापाडी मतदारसंघ- नीलेश सातपुते २२६ (विजयी), किसन सानप ३५.
माजी खासदारांच्या नातवाचा पराभवनगर बाजार समितीच्या उभारणीमध्ये माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे सर्वाधिक योगदान आहे. त्यांनी तब्बल २० वर्ष बाजार समितीवर राज्य केले. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांचे नातू अंकूश शेळके यांनी ग्रामपंचायत मतदारसंघातून उमेदवारी केली होती. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या नातवाला बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा अंदाज बांधला जात होता. परंतु, त्यांना पराभवाला सामोरो जावे लागले.
गत निवडणुकीपेक्षा यंदा महाविकास आघाडीचा अधिक मतांनी पराभवगेल्या पंधरा वर्षापासून नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत कर्डिले-कोतकर गटा विरोधात महाविकास आघाडी लढा देत आहे. गत पंच वार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन चार उमेदवार दोन, पाच, दहा मतांनी पराभूत झाले होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत ६० ते १०० मतांच्या फरकाने महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
COMMENTS