अहमदनगर | नगर सह्याद्री पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती स्वप्नील रामकृष्ण भोईटे (वय २३ रा. जयमंगलनगरी, डॉन बॉस्को, सावेडी) याला...
अहमदनगर | नगर सह्याद्री
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती स्वप्नील रामकृष्ण भोईटे (वय २३ रा. जयमंगलनगरी, डॉन बॉस्को, सावेडी) याला सहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी ठोठावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए. बी. चौधरी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.स्वप्नील भोईटे याने पत्नीस विवाहानंतर दोन महिने व्यवस्थित नांदविले. त्यानंतर नवीन दुचाकी घेऊन येण्यासाठी माहेरावरून एक लाख रूपये आणण्यासाठी छळ सुरू केला.
तिचा शारिरीक व मानसिक छळ करून तिस वेळोवेळी शिवीगाळ,दमदाटी व मारहाण करत होता. या छळास कंटाळून तिने दिनांक १५ जुलै २०१५ रोजी घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्नील भोईटेविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एन. काळे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यामध्ये मयताचे वडील फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. स्वप्नील यास हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल दोषी धरून दोन वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना शिक्षा, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सहा वर्षे सक्त मजुरी व तीन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दीड महिना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. पोलीस हवालदार प्रबोध हंचे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्य केले.
COMMENTS