नगर तालुका महाविकास आघाडीचा पत्रकार परिषदेत दावा | बाजार समिती निवडणूक रणधुमाळी अहमदनगर| नगर सहयाद्री- माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके व त...
नगर तालुका महाविकास आघाडीचा पत्रकार परिषदेत दावा | बाजार समिती निवडणूक रणधुमाळी
अहमदनगर| नगर सहयाद्री-
माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके व त्यांच्या सहकार्यांनी तालुका, जिल्हा दूध संघ, खरेदी विक्री संघ, साखर कारखाना, बाजार समिती सारख्या संस्था उभ्या केल्या. परंतु, त्याच संस्था माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मोडित काढल्या. कर्डिलेंना २५ वर्षाच्या काळात एकही ठोस काम करता आले नाही. बाजार समितीत घोटाळे करुन स्वतः मलई खाण्याचे काम केले. गत निवडणुकीवेळी ते आमदार होते आता नाहीत, त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांची राजकीय दहशत मोडित काढणार असल्याचा दावा नगर तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत केला.
आमदार लंके, तनपुरे, उतरणार प्रचारात
बाजार समिती निवडणूक लढविण्याबाबत महाविकास आघाडीची बैठक झाली असून पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठी आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार यांनी त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे सुचविली आहेत. तसेच त्यांच्या प्रचाराच्या तोफाही धडाडणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, राष्ट्रवादीचे बाळासाहेब हराळ, उद्धव दुसुंगे, उद्योजक अजय लामखडे, काँग्रेसचे संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, भाऊसाहेब काळे, संदीप कर्डिले, राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, अदिनाथ गायकवाड उपस्थित होते. प्रा. गाडे म्हणाले, माजी खासदार स्व. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.
संचालक कर्डिलेंच्या कारभारला कंटाळले; शेळके
कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणीमध्ये माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे मोठे योगदान आहे. गेल्या पंधरा वर्षात बाजार समितीमध्ये सत्ताधार्यांनी मनमानी कारभार करुन मोठ्या प्रमाणात मलई खाण्याचे काम केले. शेतकर्यांची बाजार समिती वाचविण्यासाठी नगर तालुका महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. कर्डिले यांच्या मनमानी कारभाराला संचालक मंडळ वैतागले आहेत. त्यामुळे संचालक बाजार समितीत येत नाहीत. बाजार समिती कर्डिले यांच्या ताब्यात गेल्यास शेतकर्यांसाठी बाजार समिती शिल्लक राहणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके म्हणाले.
महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या पाचही शिलेदारांना रिंगणात उतरवले आहे. माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी संस्था उभ्या केल्या, त्या संस्था कर्डिले यांनी मोडित काढल्या. दूध संघ कर्डिले यांच्या ताब्यात गेल्यानंतर झोपडी कॅन्टीनजवळील चार एकर जागेचे काय झाले? जागा किती रुपयांना विकली? कोणाला विकली? तो पैसा कोणाला दिला? याचे उत्तर त्यांनी द्यावे. दूध उत्पादक शेतकर्यांना पाय ठेवायला जागा शिल्लक ठेवली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुन्हा आमदार होणार नाहीत; प्रा. गाडे
गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवाजी कर्डिले यांना पाडण्यात नगर तालुका व पाथर्डी तालुक्यातील महाविकास आघाडी यशस्वी झाली. यापुढेही नगर-श्रीगोंदा, नगर-पारनेर, नगर-राहुरी या कोणत्याही मतदारसंघातून नगर तालुका महाविकास आघाडी कर्डिले यांना आमदार होऊ देणार नाही. तसेच बाजार समितीच्या निवडणुकीत असलेली राजकीय दहशत मोडित काढणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी सांगितले.
बाजार समितीतील कोंडवाडा जागा, मुतार्या, ओपन स्पेसच्या जागांवर इमारती बांधल्या. कांदा ग्रेड सेडच्या जागेवर गाळे बांधून विकले. त्यात सहा कोटींची मलई खाल्ली. शेतकरीही त्यांच्या कारभाराला वैतागले आहेत. त्यामुळे निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनी योग्य निर्णय घेऊनच मतदान करावे अन्यथा कर्डिलेंच्या ताब्यात पुन्हा बाजार समिती गेल्यास गुंठाभर जागाही शिल्लक राहणार नाही, असे प्रा. गाडे म्हणाले.
काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही म्हणून..;संदीप कर्डिले
बाजार समितीमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांची सेवा करण्याची मोठी संधी आहे. परंतु, तेथे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही म्हणून शेतकर्यांना न्याय देवू शकलो नाही. संचालक असतांना सर्वाना समान न्याय मिळाला नाही. मिटींगमध्ये झालेल्या विषयांव्यतिरिक्त इतर विषय प्रोसिडिंगला येत होते. संचालक म्हणून शेतकर्यांसाठी काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. ठराविक संचालकांची मत्तेदारी होती. नगर तालुका महाविकास आघाडीत कोणतेही दबावाचे राजकारण नाही. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत नगर तालुका महाविकास आघाडीकडून लढण्याचा निर्णय घेतल्याचे बाजार समितीचे माजी तज्ज्ञ संचालक संदीप कर्डिले यांनी सांगितले.
तालुक्यात गट-गण निहाय दौरे सुरु असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्डिले यांच्याकडून दबावाचे राजकारण केले जात असल्याचे राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब हराळ यांनी सांगितले.
COMMENTS