अहमदनगर | नगर सह्याद्री पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेल्या गोमांसची विल्हेवाट लावण्यास महापालिकेकडून टाळाटाळ होत आहे. परिणामी पोलिस ठाणे आ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेल्या गोमांसची विल्हेवाट लावण्यास महापालिकेकडून टाळाटाळ होत आहे. परिणामी पोलिस ठाणे आवारात दुर्गंधी सुटल्याने संतापलेल्या पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सोमवारी दुपारी मनपा मुख्यालय गाठले. तेथे स्वच्छता निरीक्षक परिक्षीत बीडकर व साळवे यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर उपायुक्त यशवंत डांगे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला व गोमांसची विल्हेवाट लागली.
पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर पंचनामा होऊन गोमांसची विल्हेवाट मनपाच्या बुरुडगाव डेपोतील प्रकल्पात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मनपाचे तेथील कर्मचारी व अधिकारी गोमांसची विल्हेवाट लावण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार पोलिसांकडून केली जात आहे. रविवारपासून तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात जप्त केलेले गोमांस भरलेले वाहन उभे होते. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मनपा अधिकारी व कर्मचार्यांशी संपर्क साधला जात होता. सुरुवातीला त्यांनी आमचा प्रकल्प बंद असल्याचे सांगितले.
नंतर प्रति किलो ८० रुपये प्रमाणे विल्हेवाट लावण्यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले. यापूर्वी असे पैसे घेतले जात नव्हते. त्याची काय प्रक्रिया असेल, त्याचे उत्तर देण्यात यावे, असे तोफखाना पोलिसांनी सांगितले. मात्र, मनपाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने व परिणामी तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात दुर्गंधी सुटल्याने संतप्त पोलिस निरीक्षक साळवे यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठले.मनपा आवारातच निरीक्षक साळवे व बीडकर यांच्यात खडाजंगी उडाली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे व विभाग प्रमुख किशोर देशमुख उपस्थित होते.
मनपाकडून यापूर्वीही अडवणूक झाली होती. साधे पत्रही तुम्ही घेत नाहीत. आम्ही आता प्रक्रिया दाखवून देऊ, अशा शब्दात साळवे यांनी बीडकर यांना झापले. त्याउपरही बीडकर यांच्याकडून नकारात्मक भाषा वापरण्यात येत असल्याने अखेर उपायुक्त डांगे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला व गोमांसची विल्हेवाट लागली.
COMMENTS