मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर असून दिवसेंदिवस त्यांच्या...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.दीड महिन्यांपूर्वी ईडीने मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला असून अधिकार्यांनी मुश्रीफ यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईवरून राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील आता याबाबत भाष्य केले आहे. सोमय्या म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी मी कोल्हापूरला जायला निघालो होते. तेव्हा उद्धव ठाकरे आणि मुश्रीफ यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच जनतेच्या लक्षात आलं होतं की मुश्रीफ यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला आहे. आयकर विभाग, सहकार मंत्रालय आदींनी या घोटाळ्याची चौकशी केली आहे. हा घोटाळा १०० कोटींच्या घरात जातो आहे, त्यामुळे याची चौकशी होणार असून मुश्रीफांना याचा हिशोब द्यावाच लागेल, असे किरीट सोमय्यांनी सांगितले.
तसेच सोमय्या पुढे म्हणाले की, मुश्रीफांनी सांगितले की माझ्या कारखान्यात हजारो शेतकरी भागीदार आहेत. पण हे सर्व खोटं आहे. मुळात शेतकर्यांकडून ५० हजार घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. ४० कोटी रुपये शेतकर्यांच्या नावाने जमा केले, त्या पैशांचे काय झाले. मी कोल्हापूरला गेलो, तेव्हा शेकडो शेतकरी येऊन मला भेटले. शेतकर्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्याचा तपास सुरू आहे, असे किरीट सोमय्यांनी म्हटले.
आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका!
आम्हाला आणखी किती त्रास देणार? त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी दिली आहे. शनिवारी पहाटेच हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीच्या पथकाने धाड टाकली. हसन मुश्रीफ सध्या घरी नाहीत. घरात हसन मुश्रीफ यांच्या पत्नींसह काही महिला व मुले आहेत. त्यांच्या उपस्थितीतच ईडीच्या पथकाकडून घराची झाडाझडती घेतली जात आहे. दीड महिन्यातच दुसर्यांदा अशा पद्धतीने ईडीने धाड टाकल्याने हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ प्रचंड संतापल्या तसेच माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रूही अनावर झाले. अक्षरश: रडत सायरा मुश्रीफ यांनी माध्यमांना सांगितले की, समाजासाठी मुश्रीफ साहेबांनी आजवर खूप काम केले. अजूनही करत आहेत. मात्र असे असूनही ईडीकडून आम्हाला त्रास दिला जातोय. आणखी किती त्रास देणार आहात? आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका आणि इथून जा.
ईडी, सीबीआय विक्रम मोडणार : सुप्रिया सुळे
अनिल देशमुख यांच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने १०९ वेळा छापे मारून विक्रम केला. आता तो मोडायची शयता नाकारता येत नाही. त्यामुळेच हसन मुश्रीफांवर तिसर्यांदा झालेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. त्यामुळे कागलमध्ये मुश्रीफ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी सकाळी जोरदार घोषणाबाजी केली.
नेमके प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने छापे मारले. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी ही कारवाई सुरू आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून १५८ कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होती. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ही कारवाई होते आहे.
COMMENTS