मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली आहे. पुण्यात दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्...
मुंबई / नगर सह्याद्री -
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली आहे. पुण्यात दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय 72 होते.
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बापट यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत सविस्तर माहिती देण्यास डॉक्टरांकडून नकार देण्यात येत होता. बुलेटीनमध्येही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यांचे निधन झाले असल्याची माहिती देण्यात आली.
गिरीश बापट हे आपल्या दांडग्या जनसंपर्कासाठी ओळखले जात. आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा अजूनही दबदबा होता.
1995 मध्ये गिरीश बापट यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट मिळाले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.
COMMENTS