पारनेर | नगर सह्याद्री महाराष्ट्रामध्ये कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी सोमवारपासून (...
पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्रामध्ये कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी सोमवारपासून (दि २७) अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी दिली. विविध राजकीय पक्षांनी यासाठी बाह्या सरसावल्या असून, सोमवारपासूनच रंगत पहायला मिळणार आहे.
२७ मार्च ते ३ एप्रिलच्या दरम्यान १८ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघासाठी ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून चार, व्यापारी मतदारसंघातून दोन व हमाल मापाडी एक अशा १८ जागांसाठी २८ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. ३ एप्रिलला नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दाखल उमेदवारी अर्जांची ५ एप्रिलला छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ एप्रिल ते २० एप्रिल अशी मुदत आहे.
या निवडणुकीत २१ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह जाहीर केले जाणारा आहे. २८ एप्रिलला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली. शिवसेनेने रविवारी स्वबळाचा नारा देत माजी आमदार विजय औटी यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेतला. वासुंदे येथील शेतकरी मेळाव्यात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यामुळे सध्या तरी तिरंगी लढतीचे चित्र या निवडणुकीत दिसून येत आहे. माघार नंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
पारनेर बाजार समितीसाठी तीन हजार १३३ मतदार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेवा संस्था मतदार संघातील ११ जागांसाठी १ हजार १३३, ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागांसाठी १ हजार ५२, व्यापारी मतदारसंघातील २ जागांसाठी ५७६ तर हमाल मापाडी व तोलाई मतदारसंघातील एका जागेसाठी १६२ मतदार आहेत.
सातबारा नावावर असलेल्या शेतकर्यांना या निवडणुकीत उभे राहता येणार आहे. शासनाने शेतकर्यांसाठी पहिल्यांदाच असा निर्णय घेतला आहे. अनेक इच्छुक ग्रामपंचायत सदस्य अथवा सेवा संस्थेचे संचालक नसले तरी सर्वसामान्य शेतकरी सातबारा उताराच्या जोरावर निवडणूक रिंगणात उतरू शकतात. त्या पार्श्वभूमीवरच बाजार समिती निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी अगोदर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.
COMMENTS