शिर्डी | नगर सह्याद्री अर्थसंकल्पातून मांडलेले पंचामृत हे राज्यातील शेतक-यांच्या हिताचे आहे. या माध्यमातून राज्याला सुजलाम सुफलाम करतानाच ...
शिर्डी | नगर सह्याद्री
अर्थसंकल्पातून मांडलेले पंचामृत हे राज्यातील शेतक-यांच्या हिताचे आहे. या माध्यमातून राज्याला सुजलाम सुफलाम करतानाच शेतकरी समृध्द करण्याचा आमचा प्रयत्न असून, केंद्र सरकारच्या योजनांप्रमाणेच राज्यातही शेतक-यांसाठी योजनांची अंमलबजावणी आम्ही सुरु केली आहे. शेतक-यांसाठी निर्णय करणारेच आमचे सरकार असून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे दिली.
शिर्डी येथे महापशुधन एस्पोच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतक-यांशी संवाद साधला. राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती आपल्या भाषणातुन देतानाच शिर्डी शहराच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करणार असून थिमपार्कसाठी निधीची उपलब्धता करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमात राज्यातील पशुपालकांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तर महिला बचत गटाने तयार केलेल्या बैलगाडीची प्रतिकृती देवून मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खा.सदाशिव लोखंडे, आ.बबनराव पाचपुते, आ.राहुल कुल, आ.जयकुमार गोरे, आ.मोनीका राजळे, जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, वैभव पिचड यांच्यासह शिवसेना भाजपचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री ना.शिंदे म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे राज्य सरकार सुध्दा शेतक-यांना केंद्रभूत माणूनच निर्णय घेत आहे. पशुधन हिताय बहुजन सुखात हे ब्रीद जपत शेतकरी व पशुपालकांनासाठी सरकार काम करीत आहे. सप्टेबर २०२३ पर्यंत लम्पी लस निर्मित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असून, अर्थसंकल्पातही शाश्वत शेतीला प्राधान्य देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महापशुधन एस्पोच्या माध्यमातून शेतक-यांना मोठी संधी मिळाली असून, पशुधनाच्या संवर्धनासाठी राज्यात सुरु असलेले काम हे निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठबळ देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरु केली त्याच धर्तीवर राज्यातही ६ हजार रुपयांची अधिक भर टाकून राज्यातील शेतक-यांना १२ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता होत असून, सहकार मंत्रालयाने राज्यातील सहकारी साखर कारखानदारीवर असलेला आयकराचा १० हजार कोटी रुपयांचा बोजा कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सहकारी चळवळीला मोठा दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले. याप्रसंबी बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी महाएस्पोच्या आयोजनाचे कौतुक केले. महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने मागील आठ महिन्यात घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयांमुळे दूध उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातूनही दुग्ध व्यवसायाच्या नव्या संधी शेतक-यांना मिळाव्यात हा उद्देश असून, दुधामध्ये भेसळ न करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले. खासदार सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांचेही याप्रसंगी भाषण झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये थिमपार्क उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून नगरविकास मंत्री या नात्याने शिर्डीच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. निळवंडे प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले. तसेच या प्रकल्पाला जलसंपदा मंत्री असताना मंत्री गिरीष महाजन यांनी सहकार्य केल्याची आठवण त्यांनी सांगितली. धाराशिव या आकांक्षीत जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान पशुसंवर्धन विभाग व भारत फायन्नाशियल इन्युजन लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करारही या महाएस्पोमध्ये मुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
COMMENTS