विकास मंडळाचे अध्यक्ष किशोर गांगर्डे यांचे आवाहन: पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्था निवडणूृक अहमदनगर | नगर सह्याद्री विम...
विकास मंडळाचे अध्यक्ष किशोर गांगर्डे यांचे आवाहन: पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्था निवडणूृक
विमा योजनेच्या नावाखाली सभासदांच्या नरडीचा घोट स्वत:चे घर भरविणार्यांनी कोरोना कालावधीतील ऑनलाईन सभेचा खर्च काही लाख रुपये दाखवला आणि संस्थेच्या तिजोरीवर डल्ला मारला. उमेश डावखर, नारायण तमनर आणि अजय लखापती या त्रिकुटाने सभासदांची असणारी ही संस्था स्वत:ची जहागीरी असल्यागत लुबाडली. या संस्थेतील तिजोरीचे रक्त या तिघांच्या तोंडाला लागले असून या तिघांसह त्यांना पाठबळ देणार्यांच्या तावडीतून ही संस्था वाचविण्यासाठी सभासद सज्ज झाले असून विकास मंडळ मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास अहमदनगर जिल्हा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्था निवडणुकीतील विकास मंडळाचे अध्यक्ष किशोर गांगर्डे यांनी व्यक्त केला आहे.
संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यात किशोर गांगर्डे यांनी मंडळाची भूमिका मांडली. विकास मंडळ निवडणूक आमचे मार्गदर्शक दत्तात्रय गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली लढवत असून आम्हाला संस्थेतील अनेक ज्येष्ठ मंडळी, आजी- माजी पदाधिकारी, संचालक, सभासद यांचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे गांगर्डे यांनी सांगितले. कोरोना कालावधीत पतसंस्थेची वार्षिक सभा सन २०२० व सन २०२१ मध्ये घेण्यात आली नाही. वार्षिक सभाच न झाल्यामुळे सभासदांना उपस्थिती भत्ता देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.तरी देखिल या दोन वार्षिक सभांसाठी विद्यमान सत्ताधारी संचालकांनी वार्षिक अहवालात सन २०२०-२१ मध्ये १ लाख ६ हजार ३८२ रुपये व सन २०२१-२२ मध्ये रु.३ लाख २४ हजार ३४८ रुपये इतका वार्षिक सभा व उपस्थित भत्ता खर्च दाखविला आहे. दोन्ही वर्षात ऑनलाईन वार्षिक सभा पार पडली मग किती सदस्यांना उपस्थिती भत्ता मिळाला का नाही? हा सरळ सरळ दिवसा ढवळ्या पतसंस्थेवर टाकलेला दरोडा नव्हे काय ? तसेच चालु आर्थिक वर्षातही वार्षिक सभेस अत्यंत कमी उपस्थिती होती मग जे सभासद या सभेला उपस्थित नव्हते त्यांच्या नावावर देखिल उपस्थित भत्ता खर्च दाखवलाच असून हा देखील दुसरा दरोडा समजायचा का?
विद्यमान सत्ताधारी संचालकांचा सर्वात मोठा घोटाळा म्हणजे कर्जासाठी लागु केलेली विमा पॉलिसी. टक्केवारी मिळविण्यासाठी दिवसा ढवळ्या थेट सभासदांवरच टाकलेला दरोडा ठरला. कुठुंबियासाठी व जामिनदारांच्या हितासाठी विमा आवश्यक केल्याचे सत्ताधारी सांगताहेत.परंतु यात खरे हित कोणाचे साधले जातेय हे सभासदांच्या लक्षात येत आहे. पंधरा लाखाचे कर्ज काढण्यासाठी सभासदांना गरज नसतांना पन्नास लाखांचा विमा गळ्यात मारण्यात आला आहे.कारण विमा रक्कम जितकी जास्त तितकी कमिशनची रक्कम जास्त. मग हे कमिशन मिळतेय कुणाला? बाजारात वीस पंचविस विमा कंपन्या असतांना काही ठराविक कंपन्यांचाच विमा घेण्याचा आग्रह का? विमा कालावधीही पंधरा ते वीस वर्षांचा. जोपर्यंत सभासद विमा हप्ता भरत राहणार तोपर्यंत या लोकांना कमिशन मिळतच राहणार. म्हणजेच या लोकांनी सभासद जामिनदार यांच्या हिताच्या नावाखाली आपली पुढच्या पंधरा वीस वर्षांची आर्थिक सोय करुन ठेवली आहे.कुठल्याही शासकीय पतसंस्थेत कर्जासाठी विमा आवश्यक नसतांना केवळ पुढच्या पंधरा वीस वर्षांसाठी कमिशन मिळत राहील या एकमेव उद्देशाने सभासदांना साध्या कर्जासाठी विमा आवश्यक केला.सभासदांची व जामिनदारांची इतकी काळजी होती तर मग एक रकमी कमी हप्ता असणारा केवळ कर्जाच्या रकमे एवढाच विमा का काढण्यात आला नाही ? सभासदांच्या वयानुसार विमा हप्ता बदलत असला तरी बाजारात अनेक पर्यायी विमे आहेत.एकदा विमा काढल्यावर सभासदाने पाच सहा वर्षातच पतसंस्थेचे कर्ज पुर्ण फेडले तरी सभासदांना पंधरा वीस वर्ष विमा भरावाच लागतो.मधेच विमा बंद केला तर मोठे आर्थिक नुकसान होते.आपण भरलेली रकमेपेक्षा कमी रक्कम मिळते.तसेच आपल्या रकमेवर विमा कंपनीकडुन कुठलेही व्याज देखिल मिळत नाही.या सर्व गोष्टी सभासदांपासुन लपविण्यात आल्या.सभासदाला विम्याचा वार्षिक हप्ता तीस ते चाळीस हजार रुपये भरावा लागत आहे.पहिला हप्ता कर्जातुन भरत असल्यामुळे त्याची तिव्रता जाणुन येत नाही.मात्र त्यानंतरचे हप्ते भरणेकरिता सभासदांना पुन्हा तातडी कर्जच काढण्याची वेळ येत आहे.कारण पतसंस्थेची वजावट होवुन शिल्लक रकमेतुन तो हा भरमसाठ विमा हप्ता भरुच शकत नाही.एकप्रकारे सभासदांना कायमस्वरुपी कर्जबाजारी बनवण्याचा हा प्रकार आहे. विकास मंडळ सत्तेत येताच हा टक्केवारीचा मोठा उद्योग बंद केला जाईल असे विकास मंडळाचे अध्यक्ष किशोर गांगर्डे यांनी जाहीर केले.
संगणक प्रणाली ही पतसंस्थेसाठी अत्यावश्यक बाब असली तरी बाजारात अनेक नामांकीत कंपनीचे संगणक प्रणाली अतिशय स्वस्त दरात उपलब्ध असतांना केवळ कमिशन लाटण्याच्या उद्देशाने अतिशय महागडी व दर्जाहिन असलेली संगणक प्रणाली घेण्यात येवुन पतसंस्थेचे पर्यायाने सभासदांच्या हिताचे आर्थिक नुकसान करण्यात आले. संगणक प्रणाली घेण्यापुर्वी इतर शासकीय पतसंस्थेत कुठली संगणक प्रणाली वापरण्यात येते याचा न करता फक्त टक्केवारी लाटण्यासाठी या तिघांनी संस्थेची लूट केली. सत्ताधारी संचालकांचे नेते स्वत:ला थोर महापुरुषांपेक्षा मोठे समजत असून त्यांच्या वचननाम्यात त्यांनी महापुरुषांपेक्षाही मोठे स्थान मिळविले आहे. वचननाम्यात स्वत:चे फोटो वरच्या स्थानावर लावुन महापुरुषांचे फोटोंना खालच्या ओळीत जागा दिली आहे. यावरुनच यांना आपल्या पदाचा किती गर्व झाला आहे याची जाणिव सर्व सभासदांना होत असून अशा गर्विष्ठ,घमंडी लोकांना खाली खेचण्याची वेळ आली असून संस्थेच्या सभासदांनी आता बदल करण्याचे ठरविले असून ते त्यांना मतदानातून जागा दाखवून देतील असा विश्वास गांगर्डे यांनी व्यक्त केला.
पद बदलाचे व वेतनवाढीच्या नावाखाली सहकार्यांकडूनलाखो रुपये गोळा करणार्यांना कोणता नैतिक अधिकार?नारायण तमनर या विद्यमान सत्ताधारी संचालकाने सिंचन मित्रांना पद बदलाचे व वेतनवाढीचे गाजर दाखवुन त्यांच्याकडुन लाखो रुपये गोळा केले व त्या पैशातुन खासगी सावकारी सुरु केली. योग्य सविनय मार्गाने इतर शासकीय विभागातील सिंचन मित्रांप्रमाणेच फिल्डवर काम करणारे कर्मचारी यांच्या वेतनात सुधारणा झाली मात्र ज्या सिंचन मित्रांनी अतिशय विश्वासाने या संचालकावर आपली कष्टाची कमाई सपुर्द केली त्यांचा या संचालकाकडुन विश्वासघात करण्यात आला.जो आपल्या सहकारी कर्मचारी यांचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करुन घेतो अशा व्यक्तीकडुन सभासदांनी संस्थेच्या हिताची अपेक्षाच धरु नये.विशेष बाब म्हणजे या संचालकाला पतसंस्थेतील पदाचा आपला कालावधी पुर्ण न करताच राजीनामा देण्याची नामुष्की आली असल्याकडे किशोर गांगर्डे यांनी लक्ष वेधले.कर्मचारी संपावर अन् उपाध्यक्ष निवडणुकीत;हे तर पुतणा मावशीचे प्रेम- किशोर गांगर्डेसत्ताधारी संचालकांच्या नेत्याने फक्त आणि फक्त पतसंस्थेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन कर्मचारी संघटनेचे पद मागवून घेतले आणि बळजबरीने पदरात पाडुन घेतले. जुनी पेन्शन योजना सर्व शासकीय कर्मचारी यांच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आम्ही या विषयावर सर्व कर्मचार्यांच्या सोबत जाहीरपणे भूमिका घेतली असताना हे कथीत उपाध्यक्ष संस्थेच्या निवडणुकीतील पार्ट्या झोडत होते. आंदोलन सोडुन हा नेता पतसंस्थेच्या प्रचारात दंग होता, याचाच अर्थ या कथीत उपाध्यक्षाला कर्मचारी अन् सभासद यांचे हित याच्याशी काही देणे घेणे नसून त्याचे पुतणा मावशीचे प्रेम आता लपून राहिलेले नाही.निष्कलंक उमेदवार हीच आमची जमेची बाजूनिवडणुकीत आमचे उमेदवार निष्कलंक असून कोणावरही कुठल्याही प्रकारचा डाग नाही. कुणावर विरोधकांना चिखल फेक करायला जागा नाही. त्यामुळे ते जुन्या फायली काढुन माजी संचालकांवर आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे सर्व उमेदवार हे संस्थेच्या कारभारात चांगले काम करतील व जो वचन नामा दिलेला आहे. तो पुर्ण करण्यासाठी कटीबध्द रहातील यात काडीमात्र शंका नाही. सभासदांचा विश्वास विकास पॅनलवर असून दत्तात्रय पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनीच या संस्थेत परिवर्तन करण्यासाठीची लढाई हाती घेतली असून आमचा विजय सभासदांनीच निश्चीत केला असल्याचे किशोर गांगर्डे यांनी सांगितले.
COMMENTS