आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत किडनी विकार तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद अहमदनगर | नगर सह्याद्री संपूर्ण भारतात आज हृदयरोग आणि किडनी विकाराच...
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत किडनी विकार तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद
अहमदनगर | नगर सह्याद्री
संपूर्ण भारतात आज हृदयरोग आणि किडनी विकाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अशा रूग्णांना दर्जेदार उपचार तेही अतिशय अल्प दरात मिळणे गरजेचे आहे.् आचार्यश्रींच्या आशीर्वादाने आणि प्रबुद्ध विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये सेवाभावी वृत्तीने गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा दिली जाते. जैन सोशल फेडरेशनचे हे कार्य खरी मानव सेवा आहे. याठिकाणी येणे कायम मनाला आनंद देऊन जाते. किडनी विकारावर येथे मिळणारी सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३१ व्या पुण्यस्मरणानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराअंतर्गत किडनी विकार तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन पोपटराव पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी माणिक पब्लिक ट्रस्टचे विश्वस्त आणि डायलिसिस विभागाचे आधारस्तंभ प्रकाश मुनोत, अभय पारख, शिबिराचे आयोजक रियल इस्टेट डेव्हलपर शिरिष भागचंदजी बोरा, सिव्हिल इंजिनिअर धीरजकुमार शिरीषकुमार बोरा, टॅस कन्सल्टंट रूपेश शिरीषकुमार बोरा, अनिता बोरा, प्रिया बोरा, निमा आयुर्वेद संघटनेचे डॉ. रवींद्र मिरगणे , डॉ. शांतीलाल कटारिया, डॉ.प्रशांत महांडुळे, अभय पारख, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉ.प्रकाश कांकरिया, प्रकाश छल्लानी, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, नेफ्रोलॉजीस्ट डॉ. गोविंद कासट, डॉ. जयप्रकाश शिरपूरवार आदी उपस्थित होते.प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा डायलिसिस विभाग कार्यान्वित आहे. बोरा परिवार तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने याठिकाणी अद्ययावत डायलिसिस मशिन उपलब्ध आहेत. दररोज सुमारे ७० डायलिसिस याठिकाणी होतात.्गरजू रूग्णांना ही सेवा पूर्णपणे मोफत दिली जाते. या विभागाचा सातत्याने विस्तार होत असून अनेक दानशूर व्यक्ती नवनवीन मशीनसाठी सहकार्य करीत असतात.डॉ. रवींद्र मिरगणे म्हणाले की, तब्बल २३ वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटल विविध शिबिराअंतर्गत सामान्य रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे. मानवसेवेचे हे कार्य खरोखरच ईश्वर सेवा आहे. याठिकाणी आल्यावर मानवसेवेच्या मोठ्या मंदिरात आल्याची अनुभुती येते.आयोजक शिरीषकुमार बोरा म्हणाले की, आचार्यश्रींच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने मानवसेवेच्या महान कार्यात सहभागी होताना खूप समाधान मिळाले. भविष्यातही या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळावी हीच प्रार्थना आहे. डॉ. गोविंद कासट यांनी किडनी विकार विभागातील उपलब्ध सुविधांची माहिती दिली. डॉ. आशिष भंडारी यांनी स्वागत केले तर प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. या शिबिरात ९८ रूग्णांची तपासणी करण्यात आली.
COMMENTS