कोरोना पुन्हा वाढू लागला ः दक्षतेसंदर्भात पत्र पाठविले नवी दिल्ली | वृत्तसंस्था कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महार...
कोरोना पुन्हा वाढू लागला ः दक्षतेसंदर्भात पत्र पाठविले
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला पत्र पाठवले आहे. केंद्राने या राज्यांना कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. यासाठी टेस्टिंग, उपचार, ट्रॅकिंग आणि लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार बुधवारी देशभरात कोरोनाचे ७०० हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. हे ४ महिन्यांनंतर घडले आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबरला ७३४ कोरोना रुग्ण आढळले होते. मार्च महिन्यात आतापर्यंत ५,३४६ हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात २०८२ तर दुसर्या आठवड्यात ३,२६४ रुग्ण आढळले. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात १९७ रुग्ण आढळले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ३५५ तर दुसर्या आठवड्यात ६६८ रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, सकारात्मकता दर २.६४% होता.
गुजरातमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात १३ रुग्ण आढळून आले होते. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात १०५, दुसर्या आठवड्यात २७९ रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ९६ आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात १७०, दुसर्या आठवड्यात २५८ रुग्ण आढळले. केरळमध्ये फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात ३२६, मार्चच्या पहिल्या आठवड्यात ४३४, दुसर्या आठवड्यात ५७९ रुग्ण आढळले. तेलंगणात फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात ९५, मार्चच्या पहिल्या आठवड्यात १३२, दुसर्या आठवड्यात २६७ रुग्ण आढळले. कर्नाटकात फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात ३६३, मार्चच्या पहिल्या आठवड्यात ४९३, दुसर्या आठवड्यात ६०४ रुग्ण आढळले आहेत.
गुजरात, महाराष्ट्रात आढळला रीकॉम्बिनंट व्हेरियंट एक्सबीबी
रीकॉम्बिनंट व्हेरियंट एक्सबीबीचे उपप्रकार गुजरात आणि महाराष्ट्रात सापडले आहेत. हा रीकॉम्बिनंट प्रकार ओमायक्रॉनच्या दोन उपप्रकारांनी बनला आहे. १५ फेब्रुवारीपासून दोन्ही राज्यांतील बहुतांश नमुन्यांमध्ये हा प्रकार आढळून येत आहे.
COMMENTS