नवी दिल्ली | वृत्तसंस्था यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका फेक एनकाऊंटरमध्ये अडकवण्याचा दबाव माझ्यावर आणला होता, असा ख...
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका फेक एनकाऊंटरमध्ये अडकवण्याचा दबाव माझ्यावर आणला होता, असा खळबळजक दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी केला. ते एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात संवाद साधत होते. या कार्यक्रमात अमित शहा यांना प्रश्न विचारला की, विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर एजन्सीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आहेत.
शहा म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात सीबीआयने त्यांना फेक एनकाऊंटर प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी तपास यंत्रणेने माझ्यावर पंतप्रधान मोदींना अडकवण्यासाठी दबाव आणला होता. असे असतानाही भाजपने कधीही गदारोळ केला नाही.मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा झाल्याबद्दल आणि त्यांचे सदस्यत्व गमावल्याबद्दल शहा म्हणाले, राहुल गांधी हे एकमेव राजकारणी नाहीत, ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने संसदेचे सदस्यत्व गमावले आहे.
उच्च न्यायालयात अपील करण्याऐवजी राहुल गांधी या विषयावर गोंधळ घालत आहेत. राहुल यांनी पंतप्रधानांवर आरोप करण्यापेक्षा उच्च न्यायालयात जाऊन खटला लढवावा. शिक्षा थांबवता येत नाही, अशा चुकीच्या गोष्टी काँग्रेस पसरवत आहे. न्यायालयाने मनाई केल्यास शिक्षेला स्थगिती दिली जाऊ शकते. राहुल यांनी अद्याप अपील केले नाही. हा कसला अहंकार? तुम्हाला खासदार म्हणून राहायचे आहे आणि कोर्टातही जाणार नाही. एवढा गर्व कुठून आला?
शहा म्हणाले,२०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की, शिक्षा जाहीर झाल्यानंतर लोकप्रतिनिधींचे खासदार-आमदारपद रद्द केले जातील. त्यानंतर लालू यादव, जयललिता आणि रशीद अल्वी यांसारख्या १७ बड्या नेत्यांचे सभागृहाचे सदस्यत्व यूपीएच्या काळात गेले होते. तेव्हा कोणीही काळे कपडे घालून विरोध केला नाही.
COMMENTS