मुळा पाटबंधारे विभागाकडे नगर महापालिकेने जमा केले एक कोटी अहमदनगर | नगर सह्याद्री- नगर शहराच्या पाणीपुरवठ्यावर नव्याने येणारे संकट गुरुवारी ...
मुळा पाटबंधारे विभागाकडे नगर महापालिकेने जमा केले एक कोटी
अहमदनगर | नगर सह्याद्री-
नगर शहराच्या पाणीपुरवठ्यावर नव्याने येणारे संकट गुरुवारी (२३ मार्च) अखेरच्या क्षणी टळले. मुळा धरणातून पाणी घेत असल्याने मुळा पाटबंधारे विभागाला सुमारे सव्वा पाच कोटी पाणीपट्टी देणे आहे. या पैशांसाठी त्यांनी शुक्रवारपासून (दि. २४) मुळा धरणातून पाणी उपसा बंद करण्याची नोटीस दिली होती. गुरुवारी (२३ मार्च) सायंकाळी मनपाने एक कोटी रुपये जमा केल्याने पाणी पुरवठ्यावरील संकट टळले. राहिलेले सव्वा तीन कोटी या महिनाखेरीपर्यंत जमा न केल्यास १ एप्रिलपासून धरणातील पाणी उपसा बंद करणार असल्याचे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
नगर शहराच्या पाणी पुरवठ्याचे नष्टचर्य संपायला तयार नाही. वादळवार्याने वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होतो व वीज पुरवठा नसल्याने मुळा धरणातून पाणी उपसा बंद राहतो. कधी जुनी जलवाहिनी पाणी व हवेच्या दाबाने फुटते तर कधी अन्य कारणाने फुटते. ही दुरुस्ती होईपर्यंत पाणी उपसा बंद ठेवावा लागतो. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा मागील १५ दिवसांपासून विस्कळित आहे. सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकही पाणी पुरवठ्याबाबत आंदोलने करीत आहेत. महिलांचे मोर्चेही आले आहेत.
पाणी संकट तूर्त टळले
अशा स्थितीत पाणीपट्टी थकबाकीची वसुली करण्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाने मनपाला नोटीस दिल्यावर पाणीपुरवठा बंद राहण्याची वेळ आली होती. मनपा प्रशासनाने गळ्याशी आल्यावर धावपळ करीत एक कोटी रुपये जमा करून आजचे मरण उद्यावर ढकलले आहे.
मुळा धरणातून पाणी योजनेसाठी होणार्या कच्चे पाणी उपशाचे पैसे मुळा पाटबंधारे विभागाला भरावे लागतात. त्याचे ५ कोटी २६ लाख २० हजार ८२५ रुपये मनपाकडे थकीत आहेत. ही बिगर सिंचन पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टी भरण्याबाबत मुळा पाटबंधारे विभागाने मनपाला १७ जानेवारी २०२३ रोजी नोटीस दिली होती. त्यानंतर १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी व १ मार्च अशा आणखी तीन नोटीसा दिल्या. नोटीसा बजावूनही मनपा प्रशासनाकडून पैसे भरण्याबाबत चालढकल केली जात होती. मुळा पाटबंधारेची पाणीपट्टी जमा करण्यासाठी मनपाची नेहमीच चालढकल करण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी १ मार्चला मनपात येथून आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत आयुक्त डॉ. जावळे यांनी त्यांना १५ मार्चपर्यंत थकीत रक्कम भरण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर फक्त ९२ लाख ५९ हजार १८० रुपयांची रक्कम मनपाने धनादेशाद्वारे दिली. राहिलेली ४ कोटी ३३ लाख ६१ हजार ६४५ रुपयांची रक्कम भरण्यास मनपाने वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे करारनाम्यातील अटी व शर्तीमधील अट क्रमांक ९ नुसार पाणीपट्टी न भरल्याने २४ मार्चला मुळा धरणातून सुरू असलेला पाणी उपसा बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला. यामुळे उदभवणार्या जनक्षोभास मनपा आयुक्त कार्यालय जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिला होता.
COMMENTS