मुंबई / नगर सहयाद्री - सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज 7 मंत्री अनुपस्थित असल्याने विरोधी पक्षनेत...
मुंबई / नगर सहयाद्री -
सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज 7 मंत्री अनुपस्थित असल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले. यावेळी ते म्हणाले, आज 8 लक्षवेधी होत्या. मात्र संसदिय कार्यमंत्री नसल्याने एक एक दिवस पुढे ढकलला जात आहे. गलिच्छपणाचे कामकाज आहे. कोणालाही संसदेच्या कामाविषयी गांभीर्य नाही.यावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील शेतकरी प्रश्न, संपकरी कर्मचाऱ्यांचा मुद्दा, अशा लक्षवेधी मुद्द्यांवर विधिमंडळात चर्चा होणे अपेक्षित असताना शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांनी अधिवेशनाला अचानक दांडी मारली. त्यामुळे आज ८ पैकी केवळ एका लक्षवेधीवर चर्चा झाली. मंत्री उपस्थित नसल्याने ७ लक्षवेधीवरील चर्चा उद्यावर ढकलण्यात आली.
यावर अजित पवार चांगलेच संतापले. आज एकच लक्षवेधी झाली. सभागृहात मंत्री हजर नाही म्हणून इतक कामकाज थांबवले. देवेंद्रजी तुम्हाला म्हणून बघतो. पण तुमचे लक्ष नाही. चंद्रकांत पाटील यांनी लवकर उठून आले पाहिजे. इतर मंत्र्यांनी सुद्धा सभागृहात वेळेवर हजर राहिलं पाहिजे. यांना विधिमंडळ कामकाजात रस नाही बाकींच्या कामात रस आहे. हा तर निर्लजपणाचा कळस झाला, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार भर सभागृहात संतापल्याने इतर मंत्र्यांची चांगलीच धांदल उडाली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही बाब गंभीर, दिलगीरीच व्यक्त करतो. काल रात्री 1 वाजेपर्यंत सभागृह चालले. लक्षवेधी असेल तर सकाळी उत्तर देण्यासाठी मंत्र्यांना ब्रिफिंगला वेळच मिळत नाही. मात्र आता सुधारणा करण्यात येईल. शक्यतो सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहिलेच पाहीजे, असे निर्देश देण्यात येतील.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा अजित पवारांच्या या मुद्द्यावर प्रकाश टाकला.2 हजार 376 लक्षवेधी ऑनलाईन आल्या आहेत. आपण गेल्या सहा दिवसात 57 लक्षवेधी चर्चा केली आहे. नियमानुसार तीन लक्षवेधी घेतल्या जातात पण आपण जास्त लक्षवेधी घेतो. यापुढे जास्तीत जास्त लक्षवेधी घेऊ, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांना दिलं.
COMMENTS