नवी दिल्ली वृत्तसंस्था- लोकसभेचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भ...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
लोकसभेचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. माझी खासदारकी रद्द करून मी गप्प बसेन असं तुम्हाला वाटत असेल. पण मी गप्प बसणार नाही. मी बोलतच राहणार. मी सवाल करतच राहणार असं सांगतानाच हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. तसेच मोदी आणि अदानी यांचे संबंध काय आहेत? हे लोकांना कळालं पाहिजे.
राहुल गांधी म्हणाले, लोकशाहीवर हल्ला होत आहे. आमचा फक्त एकच सवाल केला आहे. अदानीची शेल कंपनी आहे. त्यात 20 हजार कोटी कोणी गुंतवले? ते अदानीचे पैसे नाहीत. त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस आहे. पैसे इतरांचे आहेत. ते पैसे कुणाचे आहेत? मीडिया रिपोर्टमधून माहिती घेऊन मी संसदेत पुरावे दिले. मी अदानी आणि मोदी यांच्या संबंधावर भाष्य केलं. दोघांचे संबंध जुने आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांचे नाते आहे. त्यांच्या संबंधाचे फोटो दाखवले आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
"संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. मला कोणाही घाबरवू शकत नाही. माझ्यावर झालेल्या कारवाईने मी घाबरणार नाही. मी संसदेत प्रश्न विचारले, माझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. माझी खासदारकी गेल्याने मला काही फरक पडत नाही, या देशानं मला सर्वकाही दिलं आहे. देशानं मला प्रेम, सन्मान हे सर्व दिल्याचे म्हणत मी लढत राहणार असल्याचेही ,"राहुल गांधी म्हणाले.
तसेच याबद्दल पुढे बोलताना राहुल गांधी यांनी "माझी लढाई ही भारतीय लोकशाहीसाठी असून माझा आवाज दाबल्याने मी घाबरणार नाही, मी लढतचं राहणार," असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.
COMMENTS