नवी दिल्ली वृतसंस्था- मी 'यूपी में का बा' फेम नेहा सिंह राठौड आहे, हल्ली मला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आई धक्क्यात आहे. पती ...
नवी दिल्ली वृतसंस्था-
मी 'यूपी में का बा' फेम नेहा सिंह राठौड आहे, हल्ली मला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आई धक्क्यात आहे. पती हिमांशूला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. माझे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ आहे. सासरचे लोक टोमणे मारत आहेत. सुनेवर खूप अभिमान होता असे बोलत आहेत. कोर्टापर्यंत गेली. पुढे आणखी काय-काय करेल माहीत नाही.
ते लोक ज्या प्रकारे माझ्या मागे लागले आहेत, आता पोटा-पाण्याची चिंताही मला सतावू लागली आहे. नेहाने गाणे सोडावे अशी त्यांची इच्छा आहे, पण मी असे होऊ देणार नाही. अति झाले तर दिल्ली सोडावी लागेल. मी गावी परत जाईन. शेती करेन, पण गाणे सोडणार नाही.मी गावात राहिले आहे. गरीब कुटुंबात वाढले. माझ्या गाण्यांमध्ये गरीबांचीच गोष्ट असेल, कुणाला आवडो वा न आवडो.
जेव्हा मी पहिल्यांदा यूपी में का बा गायले तेव्हा मला इतके ट्रोल करण्यात आले की मी आतून हादरले. मी सांगू शकत नाही अशा प्रकारे लोकांनी शिवीगाळ केली. मला माझ्या कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियावर ब्लॉक करावे लागले, कारण आपल्या बहिणीला-मुलीला कुणी वेश्या म्हणणे हे कोणत्याही कुटुंबीयांना सहन होणार नाही.
त्यावेळी माझा साखरपुडा झाला होता. ज्याप्रकारे मला ट्रोल केले जात होते, त्यामुळे माझे लग्न मोडेल अशी भीती वाटत होती. जेव्हा मी हिमांशूसोबतचा फोटो शेअर केला तेव्हा लोक म्हणू लागले की ही एका रेड्याशी लग्न करत आहे. हीचा नवरा वळू आहे. लोकांनी तर इथपर्यंत लिहिलं की, तुझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, चेहरा आरशात बघ... माझी मानसिक अवस्था अशी झाली की मी आरशात माझा चेहरा पाहू लागले. कोविडमध्ये सासूचा मृत्यू झाला तेव्हा लोक म्हणू लागले की ती कुलछणी आहे. लग्नाआधी सासूला खाल्ले. मला खूप ताण आला. सुदैवाने हिमांशू आणि माझ्या सासरच्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. सासरे नेहमी म्हणायचे की तुला जे योग्य वाटेल ते कर.
नेहा सिंह राठौड कशी बनली हे फक्त मला माहीत आहे. माझी कथा खूप वेदनादायक आहे. दर पाचव्या दिवशी काही ना काही समस्या माझ्यासमोर उभ्या राहतात. माझ्या पालकांना माझे गाणे कधीच आवडले नाही. मी बीएड करून शिक्षिका व्हावं किंवा स्वयंपाकघरात राहावे अशी आईची इच्छा होती.माझे लग्न सरकारी नोकराशी झाले पाहिजे. आजही माझे वडील मला गाणे थांबवायला सांगतात, आम्हाला पैसा नको आहे, समाजात मान-सन्मान हवा आहे, पण मी जे करतेय ते योग्य आहे हे मला माहीत आहे.
COMMENTS