अहमदनगर | नगर सह्याद्री परप्रांतीय शिक्षकाने एकाच्या मदतीने जातीचा खोटा दाखला तयार करून सादर केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाख...
अहमदनगर | नगर सह्याद्री
परप्रांतीय शिक्षकाने एकाच्या मदतीने जातीचा खोटा दाखला तयार करून सादर केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक अभिषेक बिनय गुप्ता (मूळ रा. बिहार, हल्ली रा. जनता बाजार, दत्त चौक सिडको, नाशिक) व त्याला मदत करणारा सुनील पाटील (रा. सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.या प्रकरणी जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाचे पोलीस निरीक्षक सईदखाँ दादाखाँ पठाण (रा. सूर्यानगर, नगर-छत्रपती संभाजीनगर रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
अभिषेक गुप्ता नाशिक येथे वास्तव्यास असून, तो सध्या मुंबई येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने नाशिक येथील जात पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. तो समितीने फेटाळला होता. त्यानंतर त्याने नगर जिल्ह्यातील राहुरी तालुयातील एकरूखे येथील तेली समाजातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीला सादर केले होते. ते तयार करण्यासाठी त्याला सुनील पाटील याने मदत केली.
समितीने याबाबत तपासणी करण्याचा आदेश दक्षता पथकाला दिला होता. पथकाने एकरूखे गावात जाऊन चौकशी केली असता गुप्ता नावाची कुणीही व्यक्ती गावात वास्तव्यास नव्हती, असे सांगण्यात आले. याबाबत अधिक चौकशी केली असता गुप्ता बिहारमधील असून, तो शिक्षक म्हणून मुंबईत नोकरीस आहे. त्यासाठी त्याने दाखल केलेला जातीचा दाखला बनावट असल्याचे उघड झाले. त्याच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
COMMENTS