अहमदनगर | नगर सह्याद्री- पांढरीपूल (ता. नगर) परिसरात हॉटेल व कलाकेंद्र चालवून गावात दहशत पसरविणार्या गुंड प्रवृत्तीच्या कुटुंबियांवर तडीपार...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
पांढरीपूल (ता. नगर) परिसरात हॉटेल व कलाकेंद्र चालवून गावात दहशत पसरविणार्या गुंड प्रवृत्तीच्या कुटुंबियांवर तडीपारीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी वांजोळी ग्रामपंचायत कार्यालय व भारतीय लोकशाही पार्टीच्या वतीने पांढरीपुलावर ठिय्या आंदोलन केले. संतप्त ग्रामस्थांनी यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता, पोलीसांनी मध्यस्थी करुन आंदोलकांना रस्त्यावरुन बाजूला केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.
या आंदोलनात भारतीय लोकशाही पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब काळे, वांजोळी सोसायटीचे माजी चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, उद्योजक मच्छिंद्र पागिरे, नवनाथ पागिरे, काशिनाथ पागिरे, तंटामुक्ती गावचे अध्यक्ष आप्पासाहेब खंडागळे, मेजर तुकाराम डफळ, लोकशाही पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, राम कराळे, भगवान येळवंडे, उमाजी ससे, महेश काळे, वांजोळी सोसायटी चेअरमन विजयाताई काळे, लता खंडागळे, वांजोळी सरपंच सोनाली खंडागळे, खोसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.
पांढरीपूल येथे संभाजी पालवे, भरत पालवे, राणा पालवे, जनताराम पालवे, विशाल पालवे आदी पालवे कुटुंबीय हॉटेल व कला केंद्र चालवित आहेत. हॉटेल व कला केंद्रामध्ये गुंडप्रवृत्तीचे लोक कामावर आहेत. कला केंद्रात वेश्या व्यवसाय चालविला जातो. मागील महिन्यात कला केंद्रावर अनधिकृत सुरु वेश्या व्यवसाय प्रकरणी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र पुन्हा वेश्या व्यवसाय जोमाने सुरु झाला आहे.
या कला केंद्रात येणार्या ग्रामस्थांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे, मोबाईल काढून दादागिरी करण्यात येते. हे हॉटेल विनापरवाना असून त्यांच्याकडे अन्न-औषध प्रशासनाचा कोणताही कायदेशीर परवाना नाही. हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री केली जाते. हॉटेलचे रस्त्यावर अतिक्रमण आहे.
गुंड प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठविणार्यांची पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नाही. मात्र त्यांच्या विरोधात गेलेल्या एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. संबंधित व्यक्तीवर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचे निवेदन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना देण्यात आले.
COMMENTS