पुणे | नगर सह्याद्री - पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. सासू आणि दिराने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीच...
पुणे | नगर सह्याद्री -
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. सासू आणि दिराने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार सुनेच्या तक्रारीनंतर समोर आला आहे.
याप्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात २७ वर्षीय तक्रारदार पीडितेनं गुन्हा दाखल केलाय. ऑगस्ट २०२२ मध्ये हा सर्व किळसवाणा प्रकार घडल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, २७ वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी येथे आपल्या माहेरी आली होती. तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या आई वडिलांना सांगितला. दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि आरोपीचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पीडित महिला ही तिच्या सासरी बीड या ठिकाणी राहण्यास गेली.
सासरच्या मंडळींनी मासिक पाळीच्या दरम्यान तिचे हातपाय बांधून मासिक पाळीचे रक्त काढत ते बाटलीत भरुन ५० हजार रुपयांमध्ये जादुटोण्यासाठी विकले, अशी धक्कादायक माहिती स्वत: पिडीतेने आपल्या घरच्यांना सांगितली.
महिलेने तिच्यासाठी घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका महिलेने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून थेट विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान या प्रकरणी पिडीत महिलेच्या सासु-सासरे,पती, मावस दीर आणि मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.
या घटनेची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या घटनेप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश देणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच, पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रद्धेला बळी पडणारी कुटु्ंब आहेत ही दुदैवी असल्याची खंतही चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले...
“पुण्यात सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकपणे बोलावंही वाटत नाही. विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात अशा भयानक गोष्टी घडत आहेत.” “या प्रकरणी मी पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यानंतर ही घटना पुणे ग्रामीणमधील असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असे निर्देश दिले,” अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.
COMMENTS