अहमदनगर | नगर सह्याद्री आपल्याकडून कोणालाही त्रास होणार नाही. कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. दुसर्यांना दुःख देऊन ते दुःखी झ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
आपल्याकडून कोणालाही त्रास होणार नाही. कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. दुसर्यांना दुःख देऊन ते दुःखी झालेले पाहून आनंदी होणे ही आपली विकृतीच आहे. ती सोडा. आपले जगणे आनंददायी होईल, असे प्रतिपादन संजय कळमकर यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य सम्राट पू.श्री.आनंदऋषीजी यांच्या ३१ व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदधाममध्ये जैन सोशल फेडरेशन आयोजित आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित महावीर व्याख्यानमालेचे सातवे पुष्प जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर गुंफताना ते बोलत होते. डॉ.मितेश कटारिया यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश भंडारी, प्रमोद गांधी, मिलिंद चवंडके हे मान्यवर उपस्थित होते. सरोज कटारिया यांनी प्रास्तविक केले.संतोष गांधी यांनी आभार मानले. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनचे नरेंद्र फिरोदिया यांच्या विशेष सहकार्यांने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
कळमकर पुढे म्हणाले, जुन्या काळात गावागावात चालणारी रामलिला सहजपणे संस्कार करायची. रामलिलेचे सादरीकरण केले जाताना कितीही चूका झाल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून श्रोते रामलिलेचा आनंद घ्यायचे. आपण आनंदापेक्षा चूका शोधत बसतो. गतकाळात करमणूकीची साधनं नव्हती. हुंड्यात रेडिओ दिला जायचा. तो ऐकण्यास आलेल्यांना हौसेने चहापान व्हायचे. कृष्णधवल टिव्हीवरील सह्याद्री या एकमेव चॅनलवर दिसणारी रामायण मालिका पहाताना अॅटीना फिरवत मालिका पहाण्याचा आनंद घेतला जायचा. टिव्ही कृष्णधवल असला तरी आनंद रंगीत असायचा. आज टिव्ही रंगीत असूनही आनंद कृष्णधवल झालाय. जिजाऊंनी शिवरायांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टीच्या संस्कारामधून शिवराय घडले.पूर्वी अपघात झाला की मदतीला माणसं धावायची. आताही धावतात पण फोटो काढण्यासाठी! हे फोटो पाहून नाईस म्हणणारे स्वतःच्या संवेदना गाडत चालले आहेत. आपल्या संवेदना मरायला लागल्या आहेत. पूर्वी आई घरातील फाटलेली कपडे बारीक सुईने शिवून अब्रु झाकायची. आता बॉम्बस्फोटमधून वाचल्यासारखे कपडे घालण्याची फॅशन आलीय.चांगली मुलंही बेसूर दिसू लागली. खरं सौंदर्य मनात असतं. चेहर्यावर नसतं. मेकअपची तर गरजच नसते. पूर्वी मेण लावून ठसठशीत कुंकू लावलेली आई जुन्या सिनेमातील नायिकेसारखी छान दिसायची. आईने घराला दिलेल्या पोतेर्याचा सुवास घरभर दरवळायचा. गावातील सर्वांसाठी वस्तरा एकच असला तरी संसर्ग होण्याची भिती नव्हती.विवाह लावताना अंतरपाट धरला जातो तो नवरा मुलगा व नवरी मुलगी प्रथमच एकमेकांना पहाण्याचा आनंद घेतात म्हणून. अलिकडे प्री विडिंगचा आनंद घेतलेल्यांचे विवाह लावताना अंतरपाट धरायचाच कशाला?असा सवाल करत कळमकर पुढे म्हणाले, पूर्वी लग्नातील लापशी उन्हात वाळवून खाण्याचा, गुडघ्यावर केलेल्या पुर्या चवीने खाण्याचा, शेवटच्या पंगतीला आमटीत पाणी ओतले तरी आमटी ओरपण्याचा आनंद घेतला जायचा. समाधान मानण्याची सवय सर्वांना होती म्हणून सगळी आनंदी होती. लग्नाचे फोटो १०-१५ वर्षानंतरही हौसेने दाखवले जायचे. दागिन्यांची हौस तेव्हाही होती. पण दागिन्यांपेक्षा मनातील आनंद महत्वाचा मानला जायचा. मन जपली जायची. एकमेकांना आधार देताना सर्व आनंदी रहातील याची काळजी घेतली जायची. काळाप्रमाणे बदलतानाचा आनंद घ्या. एकमेकांना आनंद द्या. घरात मनमोकळेपणाने बोला. सकारात्मक दृष्टीने आनंद मिळेल. आपल्या आजूबाजूला आनंद आहे. तो मुक्तपणे मिळवून जीवनाचे सुख अनुभवा, असे आवाहन कळमकर यांनी केले.
COMMENTS