बीड । नगर सहयाद्री - बीडमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीला ५ रुपयांच्या पेप्सीचे आमिष ...
बीड । नगर सहयाद्री -
बीडमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीला ५ रुपयांच्या पेप्सीचे आमिष दाखवून ४० वर्षाच्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. ३ तास मुलगी बेपत्ता राहिल्याने आईने तिचा शोध घेतला. आरोपीच्या दारात मुलीची चप्पल दिसल्यानंतर नागरिकांनी पत्रे काढून घरात प्रवेश केला. नराधमास रंगेहात पकडला. या प्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, पीडित मुलगी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घरातून बाहेर पडली. एका ४० वर्षाच्या नराधमाची तिच्यावर नजर गेली. त्याने तिच्या हातात ५ रुपये टेकवून तेथीलच एका दुकानातून पेप्सी आणण्यास सांगितले. ही मुलगी पेप्सी घेऊन येताच तिला आपल्या घरात नेत अत्याचार केला.
इकडे मुलीची आई तिचा शोध घेत होती. सर्व गल्ली शोधल्यानंतर ती कोठेही न दिसल्याने तिने रडण्यास सुरुवात केली. याचवेळी आईला मुलीची चप्पल या नराधमाच्या घराबाहेर दिसली. तिने दरवाजा वाजवला परंतु कोणीही आतून प्रतिसाद दिला नाही. आईने आरडाओरडा केला. त्यामुळे गल्लीतील लोक जमा झाले. त्यांनी घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला असता हा नराधम नग्नावस्थेत आढळला. मुलगीही घाबरलेल्या अवस्थेत रडताना दिसली.
नागरिकांनी त्याला चोप दिला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तो सध्या उपचार घेत असून त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, पुन्हा एकदा या घटनेने माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार केला आहे.
COMMENTS