संरक्षण विभागाच्या बनावट दाखल्याप्रकरणी कारवाई करणार अहमदनगर | नगर सह्याद्री शहरातील वादग्रस्त सुरभी रुग्णालयाने संरक्षण विभागाचा बनावट न...
संरक्षण विभागाच्या बनावट दाखल्याप्रकरणी कारवाई करणार
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरातील वादग्रस्त सुरभी रुग्णालयाने संरक्षण विभागाचा बनावट ना हरकत दाखला महापालिकेकडे सादर केल्याप्रकरणी रुग्णालयाची बांधकाम मान्यता व भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी महापालिका महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५१ (१) अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. मनपाच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक राम चारठाणकर यांनी सोमवारी स्थायी समितीच्या सभेत ही माहिती दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती गणेश कवडे होते.
सभेत नगरसेविका पल्लवी जाधव यांनी सुरभी रुग्णालयायासंदर्भात प्रश्न उपस्थित करत, रुग्णालयात अनेक गैरप्रकार होत आहेत, बनावट दाखले दिले जात आहेत, अशी तक्रार केली. मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशीत रुग्णालयाने लष्कराचा ’ना हरकत दाखला’ बनावट सादर केल्याचे निष्पन्न झाले. मात्र या रुग्णालयावर आयुक्तांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. रुग्णालयाचे मालक, संचालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेविका जाधव यांनी केली. या प्रश्नाला उत्तर देताना सहायक संचालक चारठाणकर यांनी येत्या आठवडाभरात सुरभी रुग्णालयाला नोटीस बजावली जाईल, असे सांगितले.
चारठाणकर म्हणाले, रुग्णालयाची परवानगी सन २०१६ मधील आहे. त्यावेळी संरक्षण विभागालगतच्या बांधकामासाठी १०० मिटरची मर्यादा होती. सध्या ती कमी करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात मुकुंदनगर, जिल्हा न्यायालय, साईदीप रुग्णालय यासह इमारती उभ्या राहिल्या. त्यांनी बांधकामासाठी लष्कराचा ना हरकत दाखला सादर केला नाही. सुरभी रुग्णालयाने ना हरकत दाखला सादर केला. हा दाखला बनावट आढळल्याने इमारत मालकाला नगरचना अधिनियमानुसार नोटीस बजावली जाईल.
COMMENTS