मुंबई / नगर सहयाद्री - महाराष्ट्र राज्याचा आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस सादर ...
मुंबई / नगर सहयाद्री -
महाराष्ट्र राज्याचा आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या बलिराज्यासाठी काय मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस आज बळीराजाला दिलासा देण्यासाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
एकीकडे शेतीमालाला भाव नसल्याने बळीराजा संकटात सापडला असताना दुसरीकडे सोमवारी सायंकाळी व रात्री वादळी वार्यासह गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसला आहे. या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर कांदा, गहू, हरभरा, वाटाणा, मका यांच्यासह फळबागांना बसला असून अनेक शेतामध्ये उभे असलेले पीक आडवे झाले आहे.
विरोधकांनीही यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय घोषणा किंवा निर्णय होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे 8 जिल्ह्यांत सुमारे 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागवण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज बळीराजाला दिलासा देण्यासाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
कृषी व संलग्न क्षेत्र आणि सेवा क्षेत्रातील विकासाचा टक्का घसरला आहे. येत्या आर्थिक वर्षात या दोन्ही क्षेत्रांत अनुक्रमे 10.2 टक्के (गतवर्षी 11.4 टक्के), 6.4 टक्के (गतवर्षी 10.5 टक्के) वाढ अपेक्षित आहे. विधिमंडळात बुधवारी सादर झालेल्या अहवालातून हे निराशाजनक चित्र समोर आले. उद्योग क्षेत्रात मात्र तेजीचे वातावरण आहे. उद्योग क्षेत्राचा विकास दर मात्र 3.8 टक्क्यांवरून 6.1 टक्के वाढीची अपेक्षा आहे.
COMMENTS